मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दहा मंत्री असणार आहेत. विदर्भाच्या वाट्याला सात कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तर मुंबईतील सहा जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला प्रत्येकी ७ मंत्रीपदं आली आहेत. तर कोकणाला चार मंत्रीपदं मिळाली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्राला विशेष प्राधान्य दिल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील आणि दत्तात्रय भरणे अशा सहा जणांना संधी दिली आहे, तर शिवसेनेकडून शंभुराज देसाई आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही. हे दोघेही तसे नवखे आहेत. काँग्रेसने विश्वजीत कदम आणि सतेज उर्फ बंटी पाटील या दोन युवा नेत्यांचा समावेश केला आहे.मराठवाड्याच्या वाट्याला सात मंत्रीपदं मिळाली आहेत. पैकी अशोक चव्हाण, अमित देशमुख या दोघांचा समावेश मंत्रमंडळात केला आहे. तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, राजेश टोपे आणि संजय बनसोडे यांना संधी देण्यात आली आहे. पैकी संजय बनसोडे हे पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. ते उदगीर या राखीव मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. तर शिवसेनेचे पैठणचे ज्येष्ठ आमदार संदीपान भुमरे यांना संधी मिळाली आहे.काँग्रेसने विदर्भाला विशेष न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार असे चार कॅबिनेट मंत्री दिले आहेत. तर शिवसेनेने संजय राठोड यांना राज्यमंत्रीपदावरून बढती देत कॅबिनेट मंत्री केले असून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना मंत्रीपद देऊन एका लढाऊ नेतृत्वाला संधी दिली आहे.विदर्भाला झुकते मापफडणवीस यांच्या मंत्रीमंडळात सहा कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री असे एकूण दहा मंत्री विदर्भातील होते. शिवाय, स्वत: फडणवीस विदर्भातील होते. ठाकरे मंत्रीमंडळात विदर्भातील सात कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असतील. शिवाय, विधानसभेचे अध्यक्षपद विदर्भातील नेते नाना पटोले यांच्याकडे आहे.मुंबईला मिळाले सहा मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईला सहा मंत्री मिळाले असून शिवसेनेने सुभाष देसाई, अनिल परब आणि आदित्य ठाकरे असे तीन कॅबिनेट मंत्री दिले आहेत. काँग्रेसने वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांना संधी दिली असून राष्टÑवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातून एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड (ठाणे), आदिती तटकरे (रायगड) व उदय सामंत (रत्नागिरी) अशा चौघांना संधी मिळाली आहे.पुण्याला मिळाले तीन मंत्रीपुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील व दत्तात्रय भरणे अशा तिघांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मंत्रीपद मिळाले आहे.विभाग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मंत्री आमदार मंत्री आमदार मंत्रीकोकण १५ २ ५ २ ० ०मराठवाडा १२ २ ८ ३ ८ २मुंबई १४ ४ १ १ ४ २उ. महाराष्ट्र ६ ३ १३ २ ७ २विदर्भ ४ २ ६ २ १५ ४प. महाराष्ट्र ५ २ २१ ६ १० २एकूण ५६ १५ ५४ १६ ४४ १२
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:24 AM