मुंबई - ओव्हरहेड वायरला कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी फटका बसला. त्यामुळे लोकल उशिराने धावू लागल्या. मरीन लाईन्स दरम्यान ओव्हरहेड वायरला कमी दाबाने विद्युत पुरवठा होत होता. त्यामुळे तब्बल पाऊण तास लोकल सेवा विस्कळीत झाली. सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका बसला असतानाच संध्याकाळी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनाही लोकल दिरंगाईचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स व चर्नी रोड दरम्यान अप धीम्या मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर असणाऱ्या ओव्हरहेड वायरला कमी दाबाने विद्युत पुरवठा होत होता. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान झालेल्या या तांत्रिक समस्येमुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांवर चांगलाच परिणाम झाला. चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान लोकल फेऱ्यांचा वेग खूपच मंदावला. त्यामुळे अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर मार्गावरील वाहतुक वळविण्यात आल्या. त्याचा परिणाम अन्य मार्गावरील लोकल फेऱ्यांवर झाला. त्यामुळे चर्चगेटहून सुटणाऱ्या आणि चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलच्या रांगाच रांगा लागल्या. (प्रतिनिधी)६0 लोकल फेऱ्या रद्दतब्बल ६0 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. जवळपास उपनगरीय मार्गावर ३९ ठिकाणी ओव्हरहेड वायरची समस्या जाणवली.हा पुरवठा संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान पुर्ववत करण्यात आला आणि लोकलचे विस्कळीत झालेले वेळापत्रक रुळावर आणण्यात आले. तरीही रात्री आठ वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.
पश्चिम रेल्वेही झाली विस्कळीत
By admin | Published: August 13, 2016 6:14 AM