लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रवाशांच्या थंडगार प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे वातानुकूलित (एसी) लोकल चाचणीसाठी सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या चाचणीनंतर पश्चिम रेल्वेवर तीन ते चार महिने या एसी लोकलची चाचणी होणार आहे.बहुचर्चित एसी लोकलची चाचणी यापूर्वी मध्य रेल्वेवर यशस्वीपणे पार पडली. एसी लोकलची उंची सामान्य लोकलच्या उंचीपेक्षा जास्त आहे. यामुळे कुर्ला ते सीएसटी दरम्यान कमी उंचीचे पूल असल्याने मध्य रेल्वेने ही लोकल न चालवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकलची कारशेडमध्ये आणि बाहेर चाचणी पूर्ण झालेली आहे.वर्षभरापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल झाली होती. एसी लोकल चाचणीसंबंधी पश्चिम रेल्वेने तत्काळ होकार कळवत एसी लोकल चाचणीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. परंतु, तब्बल वर्ष उलटले तरी प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल न आल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.अशी होईल ‘एसी’ चाचणी : मुंबईकरांच्या ‘लाइफलाइन’चे आधुनिक रूप म्हणून ‘एसी लोकल’ अशी चर्चा प्रवाशांमध्ये रंगत आहे. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेच्या ‘चर्चगेट ते बोरीवली’ आणि ‘चर्चगेट ते अंधेरी’ या स्थानकांदरम्यान एसी लोकलची चाचणी लवकरच होईल.
एसी लोकल चाचणीसाठी पश्चिम रेल्वे सज्ज
By admin | Published: May 14, 2017 5:26 AM