मुंबई : मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरील सततचे तांत्रिक बिघाड व त्यातून लोकल वाहतुकीला बसणारा फटका हा नित्याचा प्रकार झाला असताना सोमवारी माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून १८ बॅटरींची चोरी झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. परिणामी तब्बल ६0 लोकल फेऱ्या रद्द झाल्याने आणि १00 गाड्यांना उशीर झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.सकाळी ११.१८ पासून दादर ते माहीम स्थानकांदरम्यान पाच मार्गांवर ओव्हरहेड वायरला वीजपुरवठा होत नव्हता. त्यामुळे या स्थानकांदरम्यान सर्व लोकल जागीच थांबल्या आणि त्यामागोमाग अनेक लोकलच्या रांगा लागल्या. ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा पावसाळ्यात अनेकदा काही सेकंद बंद (ट्रिपिंग) होत असतो. वीजपुरवठा बंद झाल्याने सर्किट ब्रेक स्वीच रिमोटने तो सुरू केला जातो, ज्यामुळे यंत्रणेला कोणताही धोका पोहोचू शकत नाही. तत्पूर्वी सर्किट ब्रेक स्वीच बंद करण्यासाठी जी वीज लागते ती उपकेंद्रातील बॅटरीतून वापरली जाते. सोमवारी सकाळी ओव्हरहेड वायरमधील वीजपुरवठा बंद झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी माहीमच्या उपकेंद्रात गेले असता मोठ्या क्षमतेच्या तब्बल १८ बॅटरी चोरीला गेल्याचे आढळले. रेल्वे बोर्डाला याचा अहवाल देण्यात येणार आहे. दुपारी १२.१३ पासून लोकल सेवा पूर्ववत झाली. (प्रतिनिधी)गर्दुल्ल्यांकडून चोरी?बॅटरीबरोबरच सहा केबलही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दुल्ल्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन महिन्यांपूर्वीही ५७ बॅटरींची चोरीमाहीम येथील याच उपकेंद्रातून दोन महिन्यांपूर्वीही ५७ बॅटरी चोरील्या गेल्या होत्या. मात्र त्या बॅटरी छोट्या क्षमतेच्या होत्या. तरीही लोकल फेऱ्यांना त्याचा फटका बसला होता.
बॅटरी चोरांमुळे रखडली पश्चिम रेल्वे
By admin | Published: June 21, 2016 4:23 AM