ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - काल मंगळवारी अंधेरी पार्ल्याजवळ लोकलचे डबे घसरल्याने विस्कळित झालेली पश्चिम रेल्वेची गाडी आता काहिशी रूळावर आली आहे. जवळ जवळ तीस तासानंतर पश्चिम रेल्वेच्या चारही रुळांवर गाड्या काहीशा उशीराने का होईना धावत आहेत. बुधवारी सकाळी मात्र प्रवाशांचे अतोनात हाल कायम होते. रेल्वेचे डबे हटवण्यात आले होते, मात्र केवळ स्लो ट्रॅकवरून गाड्या धावत होत्या, त्याही प्रचंड विलंबाने. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले त्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचा ताण पडला होता. दुपारनंतर हळूहळू रेल्वेची वाहतूक सुरुलात झाली व गाड्या जवळपास एक तासाच्या विलंबाने धावायला लागल्या. संध्याकाळच्या सुमारास हा विलंब १० मिनिटांवर आल्याचे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.
मंगळवारी अंधेरी विलेपार्ले दरम्यान लोकल ट्रेनचे डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. चर्चगेटकडे जाणा-या जलद मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घसरेले डबे रुळावरुन हटवण्यात यश आल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले. मात्र ऐन गर्दीच्या वेळीही वाहतूक पूर्ववत न झाल्याने प्रवाशांना सलग दुस-या दिवशी मनस्ताप सोसावा लागला.
पश्चिम रेल्वेवरील खेळखोळंबा बघून अनेक प्रवाशांनी गाड्यांनी प्रवास करण्यास प्राधान्य दिले. मात्र त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही भीषण वाहतूक कोंडी झाली होती.