राम देशपांडे , अकोलादुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हैदराबाद येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या अकोल्याच्या ‘रँचो’ने एक लहानसे उपकरण तयार केले आहे. जव्वाद पटेल असे या युवकाचे नाव असून, वातावरणातील आर्द्रतेतून तासाभरात दोन लीटर पिण्यायोग्य पाणी गोळा होईल असे एक अत्याधुनिक उपकरण त्याने तयार केले आहे.हैदराबाद येथील ‘इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ येथे अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या जव्वादने थर्मोडायनॅमिक टेक्नॉलॉजीवर आधारित ८00 ग्रॅम वजनाचे एक उपकरण तयार केले आहे. मोबाइलप्रमाणेच अर्धा तास बॅटरी रिचार्ज केल्यानंतर किमान आठ तास ते चालते. मुख्यत्वे चार प्रमुख भागांत विभागलेल्या या उपकरणाची रचना जव्वादने स्वत: थ्रिडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केली आहे. संगणकीय तंत्रज्ञानावार आधारित या उपकरणाच्या वरच्या भागातील ६ व्होल्टचा पंखा वातावरणातील आर्द्रतेनुसारकमी-अधिक वेगाने फिरूनआतमध्ये येणारी हवा अधिकथंड करतो. त्याखाली स्मार्ट कंडेन्सर लागले असून, ते आतमध्ये येणाऱ्या हवेतील दवबिंदू विलग करते. त्याखाली तीन गाळण्या लागल्या असून, त्यातील पहिली गाळणी हवेतून विलग झालेल्या दवबिंदूंमधील विषारी धुलीकण विलग करते. त्याखाली ‘यूव्ही’ टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असून, अल्ट्राव्हायलेट किरणे खाली आलेल्या दवबिंदूंमधील उर्वरित विषाणू घटक नष्ट करतात. तर तिसऱ्या गाळणीमध्ये संकलित होणाऱ्या पाण्याच्या थेंबांमध्ये लोह, कॅल्शियम आदी खनिज तत्त्वे मिसळली जातात. या सर्व प्रक्रियेतून खाली येणारे दवबिंदू खालच्या जारमध्येसंकलित होतात. तासाभरात दोन लिटर पाणी संकलित करण्यासाठी वातावरणात किमान ३0 टक्केसापेक्ष आर्द्रता असणे गरजेचे आह; त्यापेक्षा कमी आर्द्रता असेल तर जारमध्ये पाणी संकलित होण्यास अधिक वेळ लागू शकतो असे जव्वादचे म्हणणे आहे. जव्वादने तयार केलेल्या या उपकरणाची नोंद चेन्नईच्या स्वामित्व हक्क (पेटंट) कार्यालयानेघेतली असून, व्यावसायिक तत्त्वावर निर्मिती करण्यासाठी याला भारतासह अनेक देशांतून मागणी होत असली तरी, ‘मेक इन इंडिया’ या योजनेंतर्गत या उपकरणाची निर्मिती भारतातच करून, सर्वप्रथम त्याचा लाभ भारतीयांना करून देण्याचा मानस जव्वादने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
वातावरणातील आर्द्रतेतून पिण्यायोग्य पाणी!
By admin | Published: August 31, 2016 5:38 AM