Aditi Tatkare : मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या बहुचर्चित योजनेतंर्गत महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. एकीकडे हजारो महिला या योजनेचा लाभ घेत असताना दुसरीकडे याच योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे महिलेला मिळणारे पैसे लाटण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये महिलांच्या नावे फॉर्म भरून कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) चालकाने हा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लक्ष घातले आहे.
या प्रकरणावर अदिती तटकरे म्हणाल्या की, नांदेडमधील संपूर्ण प्रकरण स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. आधारकार्ड वापरुन लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार या प्रकरणाची चौकशी करत आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत माझे बोलणे झाले आहे. याप्रकरणी संबंधित बँकांना तात्काळ अकाऊंट सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दुसरा कुठल्याही शासकीय योजनेचा व्यवहार होणार नाही, याची काळजी घेत आहोत.
कुठलीही प्रक्रिया करताना १५ ते २० दिवस तपासणीसाठी देत असतो. यानुसार, येत्या १ ते ३१ जुलैच्या अर्जांना ऑगस्टमध्ये लाभ वितरित केला जाणार आहे. काही ठिकाणी याचा दुरुपयोग केला जात आहे. याबद्दल शासन कारवाई करत आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रकरणात अकाऊंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रातिनिधिक स्वरुपात नागरिक सहभागी नसतील तर चौकशी अंती अकाऊंट पुन्हा सुरु करु. पण चौकशी होईपर्यंत हे अकाऊंट सील ठेवणे गरजेचे आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने एक मोठा घोटाळा केला आहे. या सीएससी केंद्राचे नाव सचिन मल्टीसर्व्हिसेस असे आहे. सचिन थोरात हा तरुण हे केंद्र चालवतो. त्याने रोजगार हमी योजनेसाठी ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक जमा केले. मात्र रोजगार हमी योजनेसाठी अर्ज भरण्याऐवजी त्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड देखील केली. महिलांच्या आधार कार्डवर त्याने पुरुषांचे नाव लिहिले. तसेच अर्ज करताना पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्यानंतर सचिन थोरात याने माझे रोजगार हमी योजनेचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, असे सांगत पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. यानंतर सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले होते. त्यानेही जमा झालेले पैसे सचिन थोरात याला नेऊन दिले. पण शंका आल्याने अलीम याने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. मनाठा गावातील ३८ तर बामणी फाटा येथील ३३ पुरुषांचे आधार कार्ड वापरुन सचिनने ३ लाख १९ हजार ५०० रुपये परस्पर लाटल्याचे उघड झाले. सीएससी चालक सध्या फरार आहे.