नवी मुंबई : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नुकत्याच जारी केलेल्या निर्णयानुसार डीटीएच कंपन्यांना 29 डिसेंबरपासून 100 चॅनल 130 रुपयांच्या किंमतीमध्ये दाखवावे लागणार आहेत. मात्र, टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून 29 डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये 29 डिसेंबरपूर्वी हे चॅनेल न घेतल्यास डीटीएच बंद होणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महत्वाचे म्हणजे आपण आधी हे समजून घेतले पाहिजे की ट्रायने हा निर्णय का आणि कोणाच्या फायद्यासाठी घेतला. टाटा स्काय, व्हिडिओकॉन, डीश टीव्ही, एअरटेलसाख्या डीटीएचवर देशाच्या भागानुसार पॅकेज देण्यात येत होते. यानंतर तुम्हाला मातृभाषेचे चॅनेल हवे असल्यास वेगळे पॅकेज, खेळांचे हवे असल्यास वेगळे, छोट्यांसाठीचे चॅनेल वेगळे आणि एचडीसाठी वेगळे असे भरमसाठ पैसे भरावे लागत होते. तसेच जवळपास 1100 चॅनेल दाखविले जात होते. यापैकी फारतर महिनाभरात 10 ते 20 चॅनल आवडीनुसार पाहिले जातात. यामुळे उरलेल्या चॅनलचे पैसे चॅनल न पाहताही भरावे लागत होते. यामुळॆ लाखो ग्राहकांनी ट्रायकडे याबाबत तक्रार केली होती. यावर ट्रायने हा निर्णय घेतला आहे.
29 डिसेंबरनंतर होणार महत्वाचा बदल म्हणजे आपल्याला हवे ते चॅनेल निवडता येणार आहेत. जर ग्राहक मराठी असेल तर त्याला साऊथचा म्हणजेच दक्षिणात्य पॅक घ्यायची गरज राहणार नाही. केवळ मराठी चॅनेल म्हणजेच स्टार, झी, आणि बातम्यांचे चॅनेल गरजेनुसार घेता येणार आहेत. शिवाय एखाद्या कंपनीचे सर्व चॅनेल पॅकेजमध्ये घेता येणार आहेत. उदा. स्टार टीव्हीचे चित्रपट, मालिका, स्पोर्ट असे वेगळे पॅकेजही कमी पैशांत पाहता येणार आहे. यामुळे अतिरिक्त चॅनलसाठी जो पैसा वसूल केला जात होता तो वाचणार आहे. या पॅकसह एखादा हिंदी, इंग्रजी बातम्या, सिनेमाचे चॅनलही वेगवेगळे खरेदी करता येणार आहेत.
टाटा स्कायच्या प्रतिनिधीशी लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप 29 डिसेंबरनंतरचे चॅनलचे दर ठरलेले नसून दर ठरल्यानंतर ग्राहकांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तोपर्यंत सध्या घेतलेले पॅकेज सुरु ठेवू शकता. 29 डिसेंबरनंतर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावरून डीटूएच प्रतिनिधींशी बोलून हवे असलेले चॅनेल, पॅकेज ग्राहक निवडू शकतात, असे सांगितले.
जो चॅनल पाहाल...त्याचेच पैसे द्याल...समजून घ्या DTH चे नवे गणित...
100 चॅनेलमध्ये काय काय? 100 चॅनेल्समध्ये 26 चॅनेल हे दूरदर्शनचे असणार आहेत. शिवाय उर्वरित चॅनेलमध्ये मालिका, सिनेमा, किड्स, म्युझिक, स्पोर्ट, न्यूज, इन्फोटेन्मेंट, डिव्होशनल सारखे प्रत्येक श्रेणीतील प्रत्येकी 5 चॅनल दाखवावे लागणार आहेत. तसेच विकत घ्यायच्या चॅनेलची किंमत 19 रुपयांपेक्षा जास्त जाणार असेल तर तो पॅकेजमध्ये न देता वेगळा द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे डीटीएचचे बिल 300 रुपयांबाहेर जाणार नसल्याची शक्यता आहे.