"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:12 PM2024-10-31T14:12:56+5:302024-10-31T14:14:09+5:30
Supriya Sule News: अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
Supriya Sule Ajit pawar News: आर. आर. पाटील यांच्याबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार आर.आर. पाटलांबद्दल असंवेदनशीलपणे बोलले, असे म्हणत इतकं गलिच्छ राजकारण आपण करायला नको, अशी शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावले.
सुप्रिया सुळे यांनी बारामतीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी नवाब मलिक यांची उमेदवारी आणि भाजपची भूमिका याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "या सगळ्यांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील ना. पत्र देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं. विरोध देवेंद्र फडणवीसांनी केला. गेल्या तीन-चार दिवसांत ज्या ज्या घटना झाल्यात, त्या सगळ्यांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनीच दिली पाहिजेत."
"याचं कारण असं की, हे खूप दुर्दैवी झालं. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी कैलासवासी आर.आर. पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं, अर्थातच त्याचा सगळ्या महाराष्ट्राने निषेध केलेला आहे. आपल्याकडे मराठी आणि भारतीय संस्कृतीत एखादा माणूस जेव्हा जातो. तेव्हा त्याचबरोबरचं आपण सगळं सोडून देतो. आपली कटुता, कितीही वैरी असला तरी..., आर.आर. पाटलांबद्दल असंवेदनशीलपणे अजित पवार बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल.", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"गेलेल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोललं नाही पाहिजे. कैलासवासी मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. महाजन साहेब आपल्यात नाहीत. पण, कधीही त्यांच्या कुटुंबात, आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात काम केलं. कधीही त्या कुटुंबाबद्दल एक शब्दही काढला नाही, काढणार नाही. इतकं गलिच्छ राजकारण आपण करायला नको", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.