राज्याचे वातावरण सध्या वेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. त्यातून वेगळ्या चर्चा होत आहेत. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. परंतू, तो अधिकार वापरताना इतरांना त्रास होता नये. भावना दुखावणार नाहीत, जाती जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असा सल्ला अजित पवारांनी कोणाचे नाव न घेता दिला. याचबरोबर मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळच्या राजकीय आजारपणाच्या टीकेवरून मी काही लेचापेचा नाही, असा इशारा अजित पवारांनी विरोधकांना दिला.
मराठा समाजाला वाटतेय त्यांना आरक्षण मिळायला हवे, धनगर समाजाला वाटतेय त्यांना आरक्षण मिळायला हवे, ओबीसी समजाला वाटतेय आमच्या ३५० जाती आहेत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जातेय. इतरांच्या आरक्षणाला धक्का न देता राहिलेल्यांना संधी दिली पाहिजे असे सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.
अजित पवार आज कर्जतमध्ये आले होते. यावेळी स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी काही समस्या मांडल्या. तो धागा पकडून पवारांनी विरोधात राहून काही काम करता येईल का? निधी मिळेल का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार न सोडता सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. विचारधारा पक्की ठेवून सत्तेत काम करुन हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. मला डेंग्यू झालेला आणि मी 15 दिवस नव्हतो. पण मला राजकीय आजार झाला, अशी टीका करण्यात आली. पण मी काय लेचापेचा नाहीय, असा इशारा अजित पवारांनी विरोधकांना दिला आहे.