मुंबई : ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र रजनीच्या स्टेजला भीषण आग लागली. यावेळी कलाकार स्टेजवर नृत्य करत होते. सुदैवाने, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात मंगळवारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने स्टेजवर परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना आखल्या आहेत? असा प्रश्न विचारत सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सिनेकलाकारांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, याची माहिती बुधवारी राज्य सरकारला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. दिपेश सिरोया यांनी सांगितले. कलाकारांना आणि प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्यांना त्यांचे काम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पुरेशी माहिती देणे बंधनकारक करा. तसेच, त्यांचा परफॉर्मन्स असलेल्या स्टेजची संपूर्ण माहिती द्यावी, अशी मागणी असोसिएशन आॅफ एडिंग जस्टीस या एनजीओने जनहित याचिकेद्वारे केली आहे. कलाकारांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कलाकारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना ?
By admin | Published: February 17, 2016 3:24 AM