मुंबई - शिवसेनेत पडलेली फूट आणि महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ या घडामोडींपासून उद्धव ठाकरे हे भाजपा आणि भाजपा नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नैतिक अध:पतन झाल्याचा टोला लगावला होता. त्याला आता भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.
केशव उपाध्ये म्हणाले की, आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. पक्षाचे उरलेले अस्तित्व वाचवून राजकीय कडेलोटापासून स्वतःचा बचाव करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ज्यांनी प्रत्येक हाताचा आधार शोधला, आणि लहानमोठ्या पक्षांची मते ओरबाडण्याचा स्वार्थीपणा करून अधःपतनाची परिसीमा गाठली, त्यांनी राजकारणातील नैतिक अधःपतनाची चिंता करावी ही आत्मवंचना म्हणावी की आत्मपरीक्षण म्हणावे हा प्रश्नच आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपविली, बाळासाहेबांचे निष्ठावंत दुरावले, स्वतःचे पक्षप्रमुखपदही स्वहस्ते संकटात आणले आणि आता अस्तित्व टिकविण्यासाठी लहानमोठ्या पक्षांचे उंबरठे झिजविले. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? पक्ष संपला, हाताशी नेतेही नाहीत आणि कार्यकर्तेही उरले नाहीत, स्वतःचे पदही राखता आले नाही आणि दोनचार लाळघोट्यांकरवी स्वतःवर स्तुतिसुमने उधळून घेण्याची वेळ आली, त्यांनी इतरांच्या अधःपतनाची उठाठेव करू नये. मुख्यमंत्रीपदावर असताना करोनामुळे घरात बसायची वेळ आली होती, आणि आता सारे काही गमावल्यामुळे घरात बसावे लागणार आहे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपसोबतची युती मोडून वेगळी चूल मांडणाऱ्या व नंतर सत्तेसाठी गोंडा घोळवत सरकारात सामील होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वार्थावर त्यांचा लाऊडस्पीकर असलेल्या संजय राऊत यांनी अगदी अलीकडेच टोमणेबाज आरसा दाखविला आहे. बाळासाहेबांनी थापलेला शेंदूराचा थर आता उघडा पडला असून आतले दगड दिसू लागले आहेत. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी पक्षाचे दुकान मी बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्टांकडेही आधारासाठी हात पसरून शिवसेनेचे दुकान बंद केले असून बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखविला, असा चिमटा केशव उपाध्ये यांनी काढला.
२०१९ मध्ये कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करून मतदारांना फसवून व युतीला दगा देत या अधःपतनाचे शिल्पकार ठरलेल्या ठाकरेंनी राजकारणातील अधःपतनावर बोलावे हा या शतकातला केविलवाणा राजकीय विनोद आहे. पडझड झालेल्या पक्षाला आणि पक्षाच्या आधाराने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्यासाठी यांनी आघाडीसाठी बाळासाहेबांनाही नाकारून राजकीय सोयीपुरते प्रबोधनकारांच्या विचारांचा बुरखा पांघरला हे अधःपतन नव्हे काय? प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांवर व बाळासाहेबांचा हिंदुत्वाच्या विचारावर सतत कडवट टीका केली होती. हे सोयीपुरते विसरून उद्धव ठाकरेंनी अखेरच्या बचावाकरिता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करताना बाळासाहेबांना डावलून प्रबोधनकारांचे नाव वापरले, या अधःपतनाला काय म्हणायचे? असा सवालही केशव उपाध्ये उपस्थित केला.