मुंबई : भाजपकडून मुख्यमंत्री आमचाच असं म्हटलं जात असताना, शिवसेना मात्र सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्व काही ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषेदेत याबाबतीत माहिती दिली होती, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्यावेळी 50-50 च्या फॉर्म्युला ठरला होता. त्याचप्रमाणे आम्ही मागणी करत असल्याचा दावा शिवसेना करत आहे. तर युती झाल्यावर या फॉर्म्युल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी 18 फेब्रुवारीला भाजप-शिवसेनेकडून युती झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेकडून सयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीत ठरलेल्या फॉर्म्युल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदारऱ्या यांची समानता राखण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. त्याप्रमाणे पद व जवाबदाऱ्या ज्या संभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीने असतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावेळी झालेल्या या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ समोर आला आहे.