Baramati: ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही...’;अजितदादांचा चढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 12:30 PM2021-07-25T12:30:23+5:302021-07-25T12:31:33+5:30
Ajit Pawar Baramati visit:अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली.
बारामती: राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही अजित पवार रोखठोक शैलीत बोलताना दिसले आहे. मग कार्यकर्त्यांना समजुन सांगणे असो किंवा त्यांना रागात बोलणे असो...अजित पवार आपल्या बोलण्याची पद्धत कायम ठेवतात. अशीच एक घटना आज बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात घडली. यावेळी अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
काल पुण्याचा दौरा आटोपून अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामं घेऊन अजित पवारांकडे आली होती. सकाळी बारामतीमधील देसाई इस्टेटमध्ये कार्यक्रम सुरु असताना एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवारांकडे आला. 'माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत, ते मिळवून देण्यासाठी मदत करा', अशी विनंती त्या व्यक्तीने केली. यानंतर पवारांचा पारा चढला. ‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. पण, चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, अशा शब्दात अजित पवारांनी त्या व्यक्तीला सुनावलं.
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत चहाच्या स्टॉलचे उद्घाटन pic.twitter.com/OBBVEwhKJf
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021
अजित पवारांनी पूर्ण केली चहावाल्याची इच्छा
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून जात आसताना एका कार्यकर्त्याने अजित पवारांकडे इच्छा व्यक्त केली, तसा आग्रहही धरला. दादा, मी फिरत्या वाहनावर टी स्टॉल चालू केले आहे, याचे उद्घाटन आपण करावे ही इच्छा या कार्यकर्त्याने बोलून दाखवली. त्यावेळी, उपमुख्यमंत्र्यांनी फीत कापून कसदार चहा स्टॉलचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवारांनी, तुझ्या चहाची क्वॉलिटी आहे का ? असे विचारून स्वतः चहाचा आस्वादही घेतला. खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते आपल्या गुळाच्या चहाच्या स्टॉलचे उद्घाटन झाल्याने या कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेना झाला होता.