महायुतीच्या शिंदे सरकारने अर्थसंकल्पावेळी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लोकसभेतील विजयामुळे कॉलर ताठ झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस तिजोरीत पैसे नाहीत, ही योजना निवडणुकीपुरतीच, नंतर पैसे मिळणार नाहीत, अशा अनेक टीका करत डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहेत. अशातच संजय राऊतांनीदेखील अनेकदा या योजनेवरून सरकारवर तोंडसुख घेतलेले असतान आज या योजनेला विरोध करायचे सोडून आम्ही निवडून आलो तर १५०० ते ३००० करू असे आश्वासन दिले आहे.
विरोधकांच्या भुमिकेच्या विपरित संजय राऊतांनी घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत राऊतांनी अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी या त्यांना पराभूत करणार आहेत, असा दावा केला. याचवेळी त्यांनी भ्रष्टाचारी आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५ कोटी दिले जातात आणि लाडक्या बहीणींच्या खात्यात केवळ १५०० रुपये टाकले जातात, ते पण मत दिलं नाही, तर काढून घेऊ, या धमक्या दिल्या जातात, असा टोला राऊत यांनी लगावला.
रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा पराभूत झालेली आहे, आणि ते असे बोलत आहेत.पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहेत का? यांची मानसिकता सरकारी पैशाने मते विकत घ्यायची आहे, असे सांगत राऊत यांनी रवी राणा यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्याच्या वक्तव्यावर टीका केली आहे. आमचे सरकार आले तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून ३००० करू असे राऊत म्हणाले आहेत. यावरून विरोधकांना नेमकी काय भुमिका घ्यायची हे कळत नाहीय हे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रातील 14 महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत. ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. लोकसभा निवडणूक घेतली कारण जगात नाचक्की झाली असती. या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न ते नक्की करतील. महायुतीला लोकसभेचा सर्व्हे अनुकूल नव्हता, विधानसभेचाही नाहीय. यामुळे काहीही करून वेळेवर निवडणुका हव्या आहेत, असे राऊत म्हणाले.