राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये सामील झाले आहेत. यांपैकी आठ नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून, शरद पवार यांचा एक गट आणि अजित पवारांचा एक गट, असे दोन गट तयार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. यावेळी तटकरे यांनीही विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली.
यावेळी, शरद पवारांचं असं काय चुकलं? की तुम्ही सर्व जण त्यांच्यापासून वेगळे झालात. शरद पवार म्हणतायत की, मला या बंडाची कल्पना नाही, बंड झालं हे त्यांनी जाहीर केलं. तरीही, मीच याच्या पाठीमागे आहे, असा एक संभ्रम निर्माण केला जातोय. खरंच, शरद पवार या बंडाच्या पाठीमागे आहेत, असं तुमचं म्हणणं आहे? असा प्रश्न सुनिल तटकरे यांना केला असता, त्यांनी एका पत्राचा दाखला दिला.
यावर बोलताना तटकरे म्हणाले, मी काल एका मुलाखतीत म्हणालो आणि अजित दादांनीही परवा स्पष्ट केलं किंवा आम्ही दोघांनीही स्पष्ट करण्यापूर्वीच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रवक्ते नव्याने नियुक्त झाले आहेत. त्यांनी त्याच्या नेहमीच्याच प्रसिद्धी लोलुपापोटी, एक पत्र शरद पवारांना लिहिलं गेल्याचा उल्लेख केला. त्यात दिलीप काका बनकरांचा उल्लेख करण्यात आला होता.
पक्षाची सामुहिक भावना सरकारमध्ये सहभागी होण्याची होती - पुढे तटकरे म्हणाले, मी एवढंच सांगेन की, गेल्या वर्षी याच जून महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार जाणार, असं जेव्हा निर्विवादपणे दिसत होतं. तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आणि सर्व विधानसभा-विधान परिषद सदस्यांनी, सही करून, आता भारतीय जनता पक्षाबरोबर स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये सहभागी होणं, हे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. असं पत्र शरद पवारांना देण्यात आलं होतं. त्यामुळे, त्यावेळी पक्षाची सामुहिक भावना, या सरकारमध्ये सहभागी होण्याची निश्चितपणे होती."
बघा सविस्तर मुलाखत -