शरद पवारांनी राजकारणात काय गुरूमंत्र दिला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 08:24 AM2023-07-23T08:24:03+5:302023-07-23T08:25:08+5:30
साहेब असो वा सगळे काका आम्ही त्यांच्यापासून घाबरून असायचो. दूर राहायचो असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.
मुंबई – अलीकडेच राष्ट्रवादी नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी काकांच्या भूमिकेपासून फारकत घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचसोबत इतर राष्ट्रवादी नेत्यांनी मंत्रिपद ग्रहण केले. गेल्या अनेक वर्षापासून अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत राजकीय जीवनात कार्यरत आहेत. सुरुवातीला खासदार त्यानंतर राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी स्वत:चा ठसा उमटवला. शरद पवार हे राजकारणात मुरब्बी नेते मानले जातात. त्यांनी अजित पवारांना काय गुरुमंत्र दिला? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्टच भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकारणात आम्हाला कुणीही काही शिकवले नाही. कुणी, कसं भाषण करायचे हे सांगितले नाही. आम्ही पाहत गेलो. जर आपल्याला राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर वेगवेगळे वक्ते लोकांसमोर कसे मुद्दे मांडतात. काय बोलला तर सभा जिंकाल हे सगळे आम्ही बघत गेलो आणि त्यातून शिकलो. काही गोष्टी या तुम्हाला उपजत असल्या पाहिजेत. शिकून तुम्हाला जेवढे शिकवले तेवढेच येणार परंतु तुमच्यात काही उपजत असेल तर त्याचा जास्त फायदा होतो असं त्यांनी म्हटलं. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच साहेब असो वा सगळे काका आम्ही त्यांच्यापासून घाबरून असायचो. दूर राहायचो. आम्ही कधी या लोकांपुढे गेलो नाही. त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची. आमच्या घरातील मुली मात्र त्यांच्याशी बोलणे, गप्पा मारणे चालायचे. पण आमच्या पिढीतील मुले कुणीच जवळ जायचे नाही. ते आले तर लांब जायचे अशी आठवणही अजित पवारांनी बोलून दाखवली.
वडिलांना होते चित्रपटांचे आकर्षण, पण...
वडिलांना सिनेइंडस्ट्रीचे आकर्षण होते. वडिलांनी साईड रोल मिळाला होता. सिनेइंडस्ट्रीत यश न मिळाल्याने ते पुन्हा बारामतीत आले. आजोबांनी त्यांना शेतीत लक्ष देण्याचे सांगितले. जिरायती, बागायती मिळून १५० एकर जमीन त्या काळात आमच्याकडे होती. या शेतीकडे लक्ष द्यायला हवे असं आजोबांना वाटले. त्यांनी माझ्या वडिलांवर जबाबदारी दिली. शेती करत करत स्थानिक राजकारण वडील पाहू लागले. छत्रपती साखर कारखान्याचे संस्थापक माझे आजोबा होते. त्याठिकाणी कालांतराने वडील संचालक झाले. त्यानंतर मी ८४ साली तिथे संचालक झालो. डेअरी, आधुनिक शेती करण्याचे काम वडिलांनी केले. वडिलांकडून खूप लाड व्हायचे. ५० वर्ष आमची दिवाळी एकत्र साजरी होतेय पण त्याआधीपासून कुटुंब दिवाळी साजरी करत आलेत. आम्ही आई वडील दोघांचे कष्ट पाहिलेत. वडील ७८ साली गेले तेव्हा मी १८ वर्षाचा होता. वडील गेल्यानंतर आईवर जबाबदारी पडली. मी कॉलेजला कोल्हापूरला होतो. वडिलांचा एक दरारा असायचा. आदरयुक्त भीती लोकांना होते. अरेला कारे म्हणायचे. कुणी हात उगारला तर वडीलही हात उगारायला मागेपुढे बघायचे नाही असं अजित पवारांनी सांगितले.