अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय राजसाहेब, नमस्कार,
नुकतीच आपली आणि देवेंद्रभाऊंची भेट झाली. भेटीचे फोटो छापून आले. वहिनी साहेबांनी देवेंद्रभाऊंना ओवाळले. सगळ्यांनी ते पाहिले. तुम्हा दोघांमध्ये काय गुफ्तगू झालं, याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. तुम्ही दोघं नेमकं काय बोललात..? आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना मंत्रिपद देऊ का?, असं विचारायला देवेंद्रभाऊ आले होते का..? चॅनलवाल्यांची डोकी भारी चालतात. अमितला मंत्रिपद देण्याचा शोधदेखील त्यांनीच लावला होता, असं आपण कोणाला तरी सांगत होता म्हणे... पण काय हरकत आहे अमित मंत्री झाला तर..? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, असं नाही वाटत का तुम्हाला..?
खरं तर तुम्ही दोघांनी जिथं कुठं चर्चा केली, त्या खोलीत चॅनलवाल्यांना बोलावून ठेवायला पाहिजे होतं... म्हणजे महाराष्ट्राचा या चर्चेत वेळ तरी गेला नसता... तुम्ही म्हणाल, असली नसती चर्चा तुम्हाला कशाला पाहिजे...? पण साहेब रुपया घसरला... डॉलर वधारला... महागाई वाढली... नाले तुंबले... घरापर्यंत पाणी आलं... हे विषय तेवढे महत्त्वाचे नाहीत. रुपया घसरला तर पुन्हा वर सरकवून नीट कमरेला बांधता येईल... पण मंदिर, धर्म, राजकारण, तुमची भेट हे विषय महाराष्ट्रात महत्त्वाचे आहेत... तेव्हा यावरच चर्चा व्हायला पाहिजे की नाही... असो. तुम्हाला नाही पटायचं... असो... आपल्या तब्येतीची चौकशी करायला जाणार हे देवेंद्रभाऊंनी विधानसभेतच जाहीरपणे सांगितलं होतं. शिवाय आपण त्यांना जे पत्र लिहिलं त्याचंही त्यांना जाम कौतुक होतं... आपल्याला असं लिहिता येणार नाही, हे त्यांनी कबूल केलं होतं... पत्र न लिहिताही त्यांना बऱ्याच गोष्टी पडद्याआडून करता येतात हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिलंय... वेश पालटून ते कसे जायचे, याचाही गौप्यस्फोट अमृता वहिनींनी केलाच आहे... असो. आमच्या पुढ्यात वेगळाच प्रश्न उभा राहिलायं...
त्या सुप्रियाताई सुळेंनी आपल्या भेटीवर एक मोठा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आमच्या पुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या म्हणाल्या, “काय दिवस आले बघा... ज्याच्याकडं एक आमदार आहे त्या नेत्याला भेटायला १०५ आमदार असणारा नेता गेला...”, त्यांचं हे विधान चूक की बरोबर..? राजकारणात कोणी कोणाला भेटायला जाताना टायमिंग फार महत्त्वाचं असतं. मात्र, एखादा नेता आजारी पडला, तर त्याला भेटायला जाताना कोणाकडे किती आमदार आहेत हा हिशोब महत्त्वाचा ठरतो का..? या न्यायाने ताईंच्या पक्षाचे नेते, चार खासदारांच्या जिवावर साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत... राष्ट्रपती झाले पाहिजेत... असं कशाच्या आधारावर बोलतात..? अर्थात हा प्रश्न डोक्यात आला म्हणून विचारला... तो चूक की बरोबर हे सुद्धा माहिती नाही...
पण राज साहेब, ताई जे बोलल्या ते एकदम शंभर टक्के खरं बोलल्या. आजारी असलं म्हणून काय झालं..? ज्याच्याकडे एक आमदार त्याच्याकडे १०५ वाल्यांनी जायचं काय काम..? त्यापेक्षा १०५ वाल्यांनी ५३ वाल्या एनसीपीला बोलवायला पाहिजे होतं... तसं न करता ते उगाच ५० वाल्या एकनाथ शिंदेंसोबत गेले... एकनाथरावांकडे असणारे ५० वेगवेगळ्या पक्षाचे... त्यापेक्षा ताईंकडचे ५३ एकगठ्ठा एकाच पक्षाचे... त्यातल्या दोघांना तर एकाच ठिकाणी ठेवलेलं.... जेव्हा पाहिजे तेव्हा बोलावून घेता आलं असतं... तसं झालं असतं तर एका झटक्यात पुन्हा नवीन सरकार बनलं असतं... उगाच एक आमदार असलेल्या तुमच्याकडेसुद्धा यायची त्यांना गरज पडली नसती... मागच्यासारखं पहाटेपर्यंत वाट बघायची पण गरज उरली नसती... अर्थात सगळी चूक १०५ वाल्या नेत्याचीच आहे... आपले दादा किती कर्तृत्ववान, त्यांना दिलं सोडून आणि उगाच आपलं ते सुरत, गुवाहाटी, गोवा फिरत बसले... म्हणून म्हणालो ताई, काय चूक बोलल्या...?
राहता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा, सभ्यपणाचा... उगाच कोणी आजारी पडलं म्हणून त्याला लगेच भेटायला कशाला जायचं.... त्या भेटीच्या बातम्या आल्या... फोटो आले... ते प्रसिद्ध झाले... यात कसली आली संस्कृती...? असं केल्यानं आजारी माणूस नीट होतो का...? त्यापेक्षा एक फोन केला असता तरी चालला असता... महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते जास्त शोभलं असतं... असं नाही का वाटत साहेब तुम्हाला...? तेव्हा ताई बोलल्या ते बरोबर बोलल्या, असं आमचं ठाम मत आहे... तुमचं काय मत आहे...? - तुमचाच, बाबूराव