Uddhav Thackeray Dasara Melava: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, आरक्षणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी असा संघर्ष सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाष्य केले. वाजपेयींनी सोलापूरमध्ये केलेल्या घोषणेचाही उल्लेख ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही संपूर्णपणे देशाची विल्हेवाट लावली आहे. हिंदू-मुस्लीम असा झगडा लावलेलाच आहे. हिंदूमध्ये पुन्हा भेदभाव करतायेत. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हिंदूमध्ये पुन्हा मराठी-अमराठी करतायेत. मराठी माणसांमध्ये पुन्हा जातीपातींमध्ये भांडणं लावतायेत. याला आरक्षण देऊ, त्याला आरक्षण देऊ. अहो, तुमच्या धमक असेल, तर तुम्ही आजपर्यंत आरक्षण देऊन दाखवायला पाहिजे होतं."
ठाकरे म्हणाले, 'वाजपेयींनी आश्वासन दिलं होतं'
"मराठ्यांचा आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, आदिवासींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, हे आजपर्यंत तुम्ही करून का दाखवलं नाही? तसं पाहिलं तर १९९५-९६ सालच्या सुमारास वाजपेयींनी सोलापूरमध्ये जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं. माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगरांना आरक्षण देईन. वाजपेयी जाऊन आज इतकी वर्षे झालीत. पण, अजूनही धनगर तसेच लढतायेत. आदिवासी, ओबीसी भयभीत झालेले आहेत. का तुम्ही हे पाप करत आहात? का जातीपातींमध्ये भांडणं लावत आहात?", असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
हेच ते शिवतीर्थ आहे, जिथून शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की, मराठा-मराठेतर,ब्राह्मण ब्राह्मणेतर,९६ कुळी-९२ कुळी, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी-कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसांची एकजूट बांधा. ती मराठी माणसांची एकजूट बांधली गेली नसती, शिवसेना उभी राहिली नसती. हिंदुत्वाचे रखवाले म्हणून जेव्हा भाजपवाले शेपट्या घालून बिळात बसले होते, तेव्हा जर मराठी माणसाची ताकद हिंदुत्व-हिंदू म्हणून उभी राहिली नसती, तर मोदीजी तुम्ही दिल्लीमध्ये आज दिसला नसता", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.