मुंबई: निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा निवडणुकीशी संबंधित इतर कामांसाठी लहान मुलांचा वापर केला जाण्याची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून असे करणा:या राजकीय पक्षांविरुद्ध काय कारवाई करणार याविषयी निश्चित भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश निवडणूक आयोगास दिले आहेत.
पुण्यातील एक नागरिक चेतन भुताडा यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयाने हाती घेतला आहे. न्या. अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गेल्या आठवडय़ात दिलेल्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात आयोगाने म्हटले होते की, निवडणुकीशी संबंधित कामांसाठी लहान मुलांचा वापर करू नये, असे पत्र आम्ही सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना, मुख्य निवडणूक अधिका:यांना व राजकीय पक्षांना पाठविले आहे. परंतु याने न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायमूर्तीनी आयोगाच्या विकलास सांगितले की, केवळ असे पत्र लिहून काही होणार नाही. निवडणुकीत लहान मुलांचा वापर झाला तर काय कारवाई करणार याचा नक्की निर्णय घेतल्याशिवाय काही साध्य होणार नाही. त्यानुसार नक्की भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोगाला 7 ऑक्टोबर्पयतची वेळ दिली गेली. याआधी झालेल्या निवडणूक प्रचारात लहान मुलेही सहभागी झाल्याची अनेक छायाचित्र याचिकेसोबत न्यायालयात सादर केली गेली. गेल्या वेळच्या सुनावणीत न्यायालयाने असे म्हटले होते की हा विषय गंभीर आहे पण त्यास आळा घालण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये तरतूद नसल्याचे प्रथमदर्श नी वाटते. आयोगाना यासाठी विद्यमान नियमांत सुधारणा करण्याचा विचार
करावा, असेही न्यायालायने सुचविले होते. (प्रतिनिधी)