महाबळेश्वर : ‘जमीन नावावर करून देतो,’ असे आमिष दाखवून साताऱ्यातील नामांकित वकील व त्याच्या मित्राने २५ लाखांना लुबाडले असल्याची तक्रार वैभव लक्ष्मण गिरी (वय ५४, रा. वारजे पुणे) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यांनी ४८७५ एकर व २५ आर जमीन विकण्याचा बहाणा केला होता. हे क्षेत्र संपूर्ण महाबळेश्वरचे आहे. त्यामुळे त्यांनी जणू अख्खं महाबळेश्वरच विकायला काढले होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी अॅड. रविराज गजानन जोशी (रा. सातारा) व सुहास लक्ष्मण वाकडे (रा. डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साताºयाचे वैभव गिरी हे मुलांच्या शिक्षणासाठी पुणे येथे राहतात. परंतु गिरी यांचे साताºयात येणे-जाणे असते. २०१८ मध्ये अॅड. रविराज जोशी यांच्याबरोबर ओळख झाली. तसेच ते न्यायालयीन कामासाठी महाबळेश्वर येथेही जात असतात. एकदा त्यांची वैभव गिरी यांच्याशी महाबळेश्वर येथे गाठ पडली. त्याचवेळी ‘महाबळेश्वर, लिंगमळा, प्रतापगड, वेण्णा लेक, आॅर्थरसीट पॉर्इंट आदी परिसरात दिवंगत दत्तो भैरव पिंगळे यांनी देवस्थान जमीन ईमान ३ च्या सनदेने ४८७५ एकर व २५ आर इतकी जमीन मिळाली आहे.
पिंगळे यांचे वारस सध्या महाबळेश्वरमध्येच राहतात. व ते माझ्या ऐकण्यातील आहेत. मी व माझे पुण्यातील मित्र सुहास वाकडे हे पिंगळे यांची जमीन तुमच्या नावे करून देऊ शकतो,’ असे आमिष अॅड. जोशी यांनी गिरी यांना दाखविले. त्यानंतर अॅड. जोशी यांनी वाकडे यांच्या पुण्यातील घरात देण्याघेण्याचे व्यवहार ठरले. गिरी व माधवी ओतारी यांनी जमीन खरेदी व्यवहारापोटी नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ या काळात पाच लाख रुपये दिले. झालेल्या व्यवहाराची नोटरी जानेवारी २०२० मध्ये पुण्यात करण्यात आली. त्यावेळी चार लाख रुपये रोख व सहा लाख रुपये बँकेतून वर्ग केले. आतापर्यंत एकूण २५ लाख रुपये दिले. मिळकतीचा ताबा देण्याची मागणी केल्यावर अॅड. जोशी व वाकडे यांनी टाळाटाळ केल्यावर गिरी यांनी पोलिसांत धाव घेतली.