ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात स्टायलिश बॅचलर म्हणून ओळख आहे. तरुणींमध्येही आदित्य चांगलेच प्रसिद्ध आहेत. आदित्य ठाकरेंची गर्लफ्रेंड आहे की नाही ? आहे तर ती कोण ? ती काय करते ? अशा चर्चा सर्रास रंगलेल्या आपण पाहिल्यात. पण खरंच आदित्यची गर्लफ्रेंड आहे का याबाबत आदित्यनेच प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी लोकमत समूहाकडून ''लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड''चे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्हीजगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांनी उपस्थित राहून या सोहळ्याला 'चार चांद' लावले. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा अवॉर्ड देण्यात आला.
अवॉर्ड मिळाल्यानंतर लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्यची मुलाखत घेतली, राजकारणाशिवाय अनेक विषयांवर आदित्यसोबत गप्पा रंगल्या. राजकारणाव्यतिरिक्त अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्यवर झाली. पण आदित्यनेही तितक्याच खुबीने प्रश्नांच्या रूपात आलेले सर्व बाऊन्सर पॉलिटिकली डक केले.
गर्लफ्रेंडबाबत कोणाबरोबर मोकळेपणाने बोलशील असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विचार न करता आदित्यने आईसोबत असं उत्तर दिलं. मात्र, गर्लफ्रेंड आहे की नाही याबाबत उत्तर देण्याचं त्याने कटाक्षाने टाळलं. हो नाही, हो नाही करत अखेर तो प्रश्न मागे पडला अन् आदित्य ठाकरेंची गर्लफ्रेंड आहे का ? याच्या उत्तराची प्रतीक्षा आणखी लांबली.
शाळेत असताना आदित्य कसा विद्यार्थी होता? यावर ते म्हणाले, राजकारणात असलो तरी मी वाईट विद्यार्थी नव्हतो. शाळा कधी बंक केली नाही, कधी आजारी असल्याचं किंवा पोट दुखत असल्याचं सांगून सुट्टी घेतली नाही. हे उत्तर देताना ओघाने आदित्य यांची नजर आईकडे वळली आणि हो ना आई असा इशाराही त्याने केला.
जेवण झाल्यावर कोणाच्या कपडयांना हात पुसलेस का? असं विचारलं तेव्हा...आदित्यमधील खोडकर मित्र सा-यांना कळाला. हो मित्रांच्या शर्टला मी हात पुसलेत. मला मित्रांच्या बुटांवर स्टॅम्प मारायचीही खोड होती अन् यामुळे माझे मित्रही हैराण असायचे.
तुम्हाला खरं वाटणार नाही पण स्टेजवर येऊन शिवसैनिकांमद्ये उत्साह भरणा-या आदित्यला स्टेजची प्रचंड भीती होती अशी कबुलीही त्याने यावेळी दिली. कधी एकदा स्टेजवरून पळतो असं वाटायचं असं तो एका प्रश्नावर म्हणाला.
याशिवाय अनेक प्रश्न आदित्यला विचारण्यात आले आणि त्यानेही तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं दिली. अखेर येत्या मुंबई महापालिकेत शिवसेनाच बाजी मारेल असा विश्वास आदित्यने व्यक्त केला.
ही संपूर्ण मुलाखत तुम्ही लोकमतच्या फेसबुक पेजवर पाहू शकता.