कोल्हापूर : शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला काय चुलीत घालायचे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी करून सत्ताधाऱ्यांना गुरुवारी घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांसाठी शासनविरोधात रस्त्यावर येण्याचाही इशारा दिला. ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २२ जूनला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक आयोजिली होती. बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, साखर उद्योगाबाबत निर्णय घेणाऱ्यांना काही कळत नाही. विरोधकांना अधिक कळते. आम्हाला विचारले जात नाही, अशी परिस्थिती आहे. उसाच्या संबंधित शासनाने काही निर्णय उशिरा घेतले आहे. ऊस तोडल्यापासून १४ दिवसांच्या आत नियमानुसार एफआरपी देणे बंधनकारक आहे. न दिल्यास संबंधित कारखान्यांची मालमत्ता व साखर जप्त करावे. संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती शासनाने पूर्ण करावी. गेल्या पंधरा वर्षांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे एफआरपीची रक्कम परवडेल इतकी झाली आहे. पुढील वर्षी पुन्हा १०० रुपये वाढणार आहे. त्यामुळे यापुढील काळातही दरासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. आमच्याशिवाय कोणीही संघर्ष करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, सरकार व आमच्यात भांडणे लावून राष्ट्रवादी मजा बघत आहे. जिल्हा बँकेने कर्जातून पाच टक्के कपात करून घेण्याचे पत्रक काढले आहे. याबद्दल बँकेचे संचालक, प्रशासनाचा निषेध आहे. हे पत्रक मागे न घेतल्यास बँकेच्या शाखांना टाळे लावण्याचे आंदोलन करू. जालिंदर पाटील म्हणाले, शासनाने छगन भुजबळांसारख्या आणखी काही घोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्त केल्यास राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील.राजेंद्र गड्यान्नावर, विठ्ठल मोरे, जनार्दन पाटील, आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, अनिल मादनाईक उपस्थित होते. नामोल्लेख टाळून मुश्रीफांचा समाचारशेतकऱ्यांचे पैसे बुडविणारेच ‘एफआरपी’साठी केवळ पेपरमध्ये फोटो छापून यावा, यासाठी मोर्चा काढीत आहेत. मोर्चावेळी काय झाले, कोणावर गुन्हा दाखल झाला, डोकी कुणाची फुटली, अशी उपरोधिक टीका आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी नामोल्लेख टाळून केली. भुजबळांनंतर जिल्ह्यातील बोक्याची वेळ कधी येते, याची प्रतीक्षा करीत आहे. भुजबळांसारखी वेळ येईल म्हणूनच अजित पवार शांत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
सरकारला काय चुलीत घालायचे का?
By admin | Published: June 19, 2015 12:42 AM