तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:37 AM2024-01-03T09:37:22+5:302024-01-03T09:38:37+5:30

अध्यक्षांनी घोषणा करूनही विधिमंडळ समित्या रखडल्या

What does the coordination committee of the three ruling parties do There is no concrete decision | तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही

तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही


मुंबई : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन सत्तारूढ पक्षांमध्ये चांगला समन्वय असावा म्हणून स्थापन केलेल्या समितीला अद्याप एकही ठोस निर्णय घेता आलेला नाही. समितीने जे ठरविले त्या मुद्द्यांना पक्षांचे शीर्षस्थ नेते मान्यता देत नसल्याचेही चित्र आहे. 

 महामंडळांवरील नियुक्ती शिंदे सरकार अद्याप करू शकलेले नाही. भाजपला ५० टक्के आणि अन्य दोन पक्षांना प्रत्येकी २५ टक्के पदे महामंडळांमध्ये द्यायची असा फॉर्म्युला समन्वय समितीने पूर्वीच ठरविला होता; पण त्यानुसार अजूनही नियुक्ती होऊ शकलेल्या नाहीत. हा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरेच मान्य केला आहे का याची माहिती कोणीही देत नाही. त्यामुळे महामंडळांवरील नियुक्तीची अनेकांची प्रतीक्षा 
कायम आहे. 

  विधिमंडळ कामकाज समित्यांची स्थापना अद्याप होऊ शकलेली नाही. विधिमंडळ अधिवेशनात या समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांची नावे जाहीर केली जातील, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते.

विधिमंडळ समित्यांवरील नावे ठरेना 
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विधिमंडळ समित्या हे विषय एकमेकांमध्ये गुंतलेले असल्यानेच समित्यांवरील नावे ठरत नाहीत अशी स्थिती आहे. समित्या जाहीर केल्या तर त्यावर ज्यांची नियुक्ती केली त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली असा अर्थ घेतला जाईल. त्यामुळेच समित्यांवर सदस्य वा अध्यक्ष होण्यास सत्तापक्षांचे आमदार फारसे इच्छुक नाहीत अशी स्थिती आहे.

 विशेषतः शिवसेनेचा शिंदे गट आणि  राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची नावे अंतिमत: अद्यापही ठरलेली नाहीत, अशी माहिती आहे. शिंदे गटात मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. समितीवर नेमणूक झाली तर मंत्रिपद मिळणार नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळे समित्यांसाठीची नावे पक्षांतर्गत वारंवार बदलली जात असल्याचे समजते. 

निर्णयाचे दावे पोकळच
भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या सत्तेतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीत तिन्हींचे वरिष्ठ मंत्री आहेत. आ. प्रसाद लाड हे समन्वयक आहेत. समितीच्या आतापर्यंत चार-पाच बैठका झाल्या; पण कोणताही ठोस निर्णय या समितीला अद्याप घेता आलेला नाही. दरवेळी निर्णय झाल्याबाबत मोठमोठे दावे मात्र केले जातात. 

आज संयुक्त पत्र परिषद
तिन्ही सत्तारूढ पक्षांच्या नेत्यांची संयुक्त पत्र परिषद ३ जानेवारीला मुंबईत होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री दादा भुसे माहिती देणार आहेत.
 

Web Title: What does the coordination committee of the three ruling parties do There is no concrete decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.