जान्हवी मोर्ये, ठाणेविद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढीस लागावी यासाठी सहा तासांची शाळा आता आठ तासांची करण्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्ताविले जात आहे. मात्र शिकवण्याची वेळ आणि आकलन शक्ती याचा काही एक संबंध नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढणार आहे. शाळेची वेळ वाढवून आकलनशक्ती वाढणार हे गृहीतकच मुळात आकलनशक्तीच्या बाहेरचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक व्यक्त करीत असल्याने या नव्या धोरणाच्या विरोधातील पडसाद उमटू लागले आहेत. डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा सोनवणे यांच्याकडे आठ तासाच्या शाळेविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या शाळा सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत भरतात.त्यांना दोन तासाची शाळा वाढवून आठ तासाची केल्यास त्यांना तो वेळ देणे शक्य आहे. मात्र ज्या शाळा दोन सत्रात सकाळ आणि दुपारी भरतात. त्यांना आठ तासाची शाळा शक्य नाही. आधीच मुलांना बसण्यासाठी जागा नसते. वर्ग विद्यार्थ्यांनी फुल्ल असतात. जागेची अडचण असते. त्यामुळे सकाळ व दुपारचे सत्र यात आठ तासाचा मेळ कसा घालायचा याचा पेच निर्माण होईल. शिक्षकांनी सहा तासाचा वेळ आणि लक्ष्य दिले तर आठ तासाची गरज भासणार नाही. अनेक शाळांनी यापूर्वी आकलनशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आठ तासाची शाळा झाल्यावर काही विद्यार्थ्यांना लवकर तर काहीना उशिरापर्यंत थांबवून ठेवण्याची वेळ येईल. वेळेचा आणि आकलनशक्ती वाढीचा काही एक संबंध नाही. आकलनशक्ती वाढीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आकलनशक्ती ही बाब व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते. त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचे प्रयोग करून आकलनशक्ती वाढू शकते. त्यात बाकीच्या गोष्टींचाही विचार होण्याची गरज आहे. त्यामुळे केवळ आठ तासाची शाळा करणे हे मला योग्य वाटत नाही असे माझे मत आहे.क्रीडा शिक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ शाळा असते असे नाही. घरी गेल्यावर अथवा शाळेत येण्यापूर्वी काही विद्यार्थी हे दोन ते तीन तास क्लासला जातात. त्यामुळे त्याच्या बुद्धीवर ताण पडणार. आठ तासामुळे तो ताण अधिक वाढणार. जे विद्यार्थी शिक्षणात मागे आहेत. त्याचा वेगळा विचार करण्यास हरकत नाही. मात्र आठ तासाची शाळा ही सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी लागू करणे हे कितपत योग्य आहे. त्याचा आधीच विचार निर्णय घेण्यापूर्वी झाला पाहिजे. मला तरी ते योग्य वाटत नाही. गुरूकुल शाळा या पूर्ण दिवसाच्या असतात. त्यात मुलांचे बालपण हरविले आहे. आठ तासाची शाळा ही मुलांची कोंडी करणारी ठरेल. तसेच त्यांच्या बालपणाला धक्का पोहचण्यास कारणीभूत ठरु शकत. शाळेची वेळ वाढली तर मुले खेळणार कधी, असा सवालही त्यांनी केला.पालक प्रभाकर आठवले यांच्या मते, सरकारने शिक्षणाचे धोरण एकदाच काय ते ठरवून घ्यावे. सहा तासाची शाळा की आठ तासाची शाळा. सारखे निर्णय बदलल्यामुळे मुले, पालक आणि शिक्षक सगळी यंत्रणाच संभ्रमात पडते. त्यामुळे तो संभ्रम दूर होण्यास बराच काळ जातो. त्यामुळे गोंधळलेली अवस्था असते. एक ना धड भाराभर चिंध्या अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे शिक्षणाचे नुकसान होत आहे. एकीकडे दप्तराचे ओझे कमी करायचे दुसरीकडे आठ तासाची शाळा करायची. एकूणच काय एकातून सुटका दुसरीकडे अडवणूक असे गणित आहे. हे मला योग्य वाटत नाही.विद्यार्थी निनाद साठे हा इयत्ता आठवीला आहे. तो मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहे. त्याने सांगितले की, शाळा आठ तासांची झाल्यास कोंडलेपणा वाढेल. अनेक विषय कठीण असतात. त्याचे आकलन होत नाही. पण वेळ वाढविल्याने ते होईल असे मला तरी वाटत नाही. ते सोपे करून सांगितले तर वेळ वाढविण्याचा प्रश्नच येणार नाही.
शिक्षणाचे तास आणि आकलनशक्तीचा संबंध काय?
By admin | Published: November 16, 2015 2:08 AM