विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची, कारण सर्व काही सेटिंग झाली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचा राजकारण झालं तर अशाच त्यांना वाचवले जाणार आहे. भाजपाला आपले संविधान बदलायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे ते स्पष्ट झाले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेला आहे. असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे. जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात हिटलरशाही सुरू झालेले आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी, तुरुगांत जाण्यापासून वाचवण्यासाठी गद्दारांच्या टोळीच्या प्रमुखाने हे सगळे केले. उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांनी स्वतःची काळजी घेतली नाही, या जनतेची काळजी घेतली. काय दिलं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्रीपद दिलं, ओळख दिली त्यांनाच फसवलं. किती काळं मन असेल या माणसाचं. ज्या माणसाला बेडवरून उठता येत नाही, त्यावेळी गद्दारी केली. गोव्यात जाऊन कसे नाचले बघितला का? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.तसेच, राज्यात जी सर्कस सुरु आहे ती थांबली पाहिजे. आम्ही न्याय शिवसेनेसाठी मागत नाही तर राज्यासाठी आणि देशासाठी मागत आहोत. महाराष्ट्र देखील देशातच आहे, देशाच्या बाहेर नाही. आमच्या राज्यावर अन्याय का केला जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकालविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे.