नागपूर : विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नावरून गुरुवारी विधान परिषदेत विरोधी पक्षातील सदस्य आक्रमक झाले होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या शाळांबाबत राज्य शासनाची सहानुभूती असल्याचा पुनरुच्चार केला. राज्यात शून्य पटसंख्या असलेल्या १० शाळा असल्याची माहिती तावडे यांनी दिली. परंतु सभागृहाबाहेर येताच त्यांनी या शाळांची संख्या १७ असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात शासकीय आकडेवारीनुसार मात्र राज्यात अशा २७ शाळा असल्याची नोंद आहे. त्यामुळे शून्य पटसंख्येच्या शाळांची कोणती संख्या खरी मानावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गुरुवारी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला. या शिक्षकांना १५ वर्षांपासून वेतन मिळाले नसून त्यांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनीदेखील त्यांची बाजू लावून धरली व कधीपासून वेतन सुरू करणार ती तारीख सांगण्याचा आग्रह धरला. यावर तावडे यांनी बुधवारी दिलेल्या निवेदनाचाच पुनरुच्चार केला. विनाअनुदानित शाळांबाबत शासन सकारात्मक असून नवीन आर्थिक वर्षापासून शासन निर्णयाच्या अधीन राहून अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे, त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील १० शाळांमध्ये ० पटसंख्या असून येथे २१ शिक्षकांना वेतन देण्यात येत आहे. १ पटसंख्या असलेल्या ७५, २ पटसंख्येच्या २१४ तर ३ पटसंख्येच्या २५३ शाळा असल्याची माहिती तावडे यांनी दिली. परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र तावडे यांनी ० पटसंख्येच्या १७ शाळा असल्याचा दावा केला. (प्रतिनिधी)
शून्य पटसंख्येच्या नेमक्या शाळा किती ?
By admin | Published: December 11, 2015 12:34 AM