अलिबाग - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे असलेल्या जागेत कथित १९ बंगल्यांप्रकरणी रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याबद्दल रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्याविरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल केला.
कोर्लई जागेत नक्की काय?रेवदंडा - मुरूड रस्त्यावर कोर्लई गावापासून एक किलोमीटरवर समुद्रकिनारी बाजूला ९ एकर जागा आहे. जागेला कुंपण आहे. या जागेत सध्या दोन मोडकी घरे, एक विहीर, नारळ, चिकूची झाडे, खतनिर्मिती टाक्या आहेत. मात्र, कथित १९ बंगले कुठेही दिसत नाहीत. जागेत गवत वाढलेले आहे.
असे आहेत आराेप... : ९ एकर जागा आर्किटेक्ट कै. अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली. या जागेत १९ बंगले बांधले. उद्धव ठाकरे यांनी ही बाब लपवून ठेवली. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दबाव आणून अधिकाऱ्यांना कागदपत्रांत छेडछाड केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला हाेता.