मुंबई-
राज्यातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीवर समाधानी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच आमचीच बाजू भक्कम असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतसोबत इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडली. यात कोर्टानं दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी २९ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. तसंच याप्रकरणावर पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं कोर्टानं नमूद केलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तापेच जैसे थे! पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार, न्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलं?
सुप्रीम कोर्टात आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. यात कोर्टानं सुनावणी १ ऑगस्टपर्यं पुढे ढकलली असली तरी राज्यातील सत्तेची परिस्थिती जैसे-थे ठेवण्यात यावं अशी मागणी शिवसेनेची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर कोर्टानं नेमका काय निर्णय दिला हे फडणवीसांनी यावेळी स्पष्टपणे समजावून सांगितलं.
"कोर्टानं जैसे-थे परिस्थीती नोटीसीबाबत दिलेली आहे. समोरच्या बाजूकडून काही नोटीस आमच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. तर आमच्याकडून म्हणजेच आमच्यासोबत असलेल्या शिवसेनेकडूनही काही नोटीस त्यांना दिल्या गेल्या आहेत. त्यावर जैसे-थेचा निर्णय कोर्टानं दिला आहे. त्यामुळे याचा कामकाजावर काही परिणाम होणार नाही. कुणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. मंत्रिमडळाचा विस्तार लवकरच होईल", असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण जावं"कोर्टात झालेल्या सुनावणीवर आम्ही नक्कीच समाधानी आहोत. कारण आमजी बाजू भक्कम आहे. प्रकरण कोर्टात असल्यानं यावर मी अधिक बोलणार नाही. पण न्यायाधीशांनी हे प्रकरण संविधान पीठाकडे जावं का याबाबतचं महत्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे यासंदर्भात १ ऑगस्ट रोजी कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे", असंही फडणवीस म्हणाले.