BJP vs NCP, Aurangzeb: औंरगाबाद शहराचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रातील सरकारने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आता लवकरच दैनंदिन वापरातून औरंगाबाद हे नाव वगळून नवे नाव येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण मुघल राजा औरंगजेब याला सम्राट संबोधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगजेबाशी नेमके काय नाते आहे? याचा जाहीर खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करावा, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मानवतेचा क्रूर हत्यारा औरंगजेबचा उल्लेख "सम्राट" असा करणे म्हणजे त्या पक्षात औरंगजेब कुणाचा नातेवाईक आहे का..? पक्षाने आता 'औरंगजेब राष्ट्रवादी पक्ष' असे नामकरण करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले असून औरंगजेबाच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली त्यात उल्लेख करताना सम्राट औरंगजेब असा उल्लेख केल्याने केवळ मतासाठी लांगूलचालन किती करावे हा राष्ट्रवादी पक्षाचा लाळघोटेपणा उघडकीस आला. औरंगजेब हा राष्ट्रवादी पक्षासाठी आदर्श असून पक्षातील कोणाचा नातेवाईक आहे का..? कारण, त्यांच्या दृष्टीने औरंगजेब हा सम्राट असेल पण, याच औरंगजेबाने आमचे आदर्श छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस बंदिस्त व हाल-हाल करून क्रूरपणे मारून टाकले मग तो आमच्यासाठी सम्राट कसा काय होऊ शकतो?" असा सवाल त्यांनी केला.
तसेच, "मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही औरंगजेबाबाबत गौरवोद्गार काढले होते हे कसे विसरता येईल, आमच्या दृष्टीने औरंगजेब हा मानवतेचा हत्यारा असून तो सम्राट होऊच शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना औरंगजेब आपला आदर्श वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नांव देखील "औरंगजेब राष्ट्रवादी पक्ष" असे करून घ्यावे," असा सल्ला भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिला.