शपथविधी आधी देवगिरी बंगल्यावर काय घडलं?; NCP आमदाराने सांगितली Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:52 PM2023-07-04T13:52:01+5:302023-07-04T13:52:44+5:30
आता मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून पुढे निर्णय घेऊ असं आमदार डॉ. किरण लहामटेंनी माहिती दिली.
मुंबई – राज्यातील राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे २ गट पडले. त्यामुळे आमदार नक्की कुणाकडे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. रविवारी घडलेल्या या राजकीय घटनेने अनेकांना धक्का बसला. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. त्यातील एक असलेले नगरचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शपथविधी सोहळ्याआधी देवगिरी बंगल्यावर काय घडले याची सविस्तर माहिती समोर आणली आहे.
आमदार डॉ. लहामटे म्हणाले की, अजितदादांचा आदल्यादिवशी रात्री १० वाजता फोन केला. दुसऱ्यादिवशी भेटायला या असं म्हटलं. मी पहाटे प्रवास करून मुंबईत पोहचलो. तिथे काही सहकारी भेटलो. तिथून ९ वाजता आम्ही देवगिरी बंगल्यावर गेलो. तिथे दौलत दरोडा भेटले मग आम्ही २-३ जण आतमध्ये बसलो. दादांशी इतर विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर आतमध्ये बऱ्याच खुर्च्या दिसल्या. नरहरी झिरवळही भेटले. ११ वाजता बैठकीची वेळ होती, १२ वाजले तरी सुरू झाली नाही. १ वाजता दादा आले. दादांनी मला विचारला तुमच्या मतदारसंघात कितीची स्थगिती आहे. विकासकामांची माहिती घेतली. मग दादा म्हणाले हे सर्व करायचे असेल तर आपल्याला सत्तेत जावे लागेल. तिथे प्रफुल पटेल, वळसे पाटील इतरही बरेच नेते उपस्थित होते. त्यामुळे मोठ्या साहेबांची सहमती असावी असं मला वाटलं. मग आम्ही आतमध्ये जाऊन एका स्टॅम्पवर सह्या केल्या असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर बाहेर आलो तेव्हा त्याठिकाणी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे बोलताना दिसल्या. तेव्हा दादा ६ वाजता शपथ घेणार आहे असं ऐकलं. इतक्या लवकर हे होईल वाटत नव्हते. पण सुप्रिया सुळे बोलल्या म्हणजे त्यांना माहिती असावी. मग आम्ही आत गेलो तिथे सूरज चव्हाण भेटले तिथे त्यांना विचारले याला साहेबांची सहमती आहे का? ते म्हणाले बहुतेक आहे. मग थोडावेळ बसल्यावर चला, आपल्याला राजभवनला जायचंय असा निरोप आला. कोण शपथ घेणार हेदेखील माहिती नव्हते. शपथविधी सोहळ्यानंतर जेव्हा बाहेर आलो. साहेबांची प्रतिक्रिया ऐकली तेव्हा याला साहेबांची संमती नसल्याचे कळाले. मग आमच्यावर धर्मसंकट आले. तेव्हा दादांना नमस्कार केला आणि मतदारसंघात निघून आलो. आता मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून पुढे निर्णय घेऊ असं आमदार डॉ. किरण लहामटेंनी माहिती दिली.
दरम्यान, २०१९ चा रणसंग्राम अनुभवला आहे. आधीच्या आमदारांना ७०-७२ हजारांच्यावर मतदान झाले नाही. मला १ लाख १३ हजार मतदान झाले. त्यात राष्ट्रवादीची २५ हजार मतदान आहे. राष्ट्रवादीची मते त्यातला भाग आहे. पिचडविरोधी मतदान मला झाले. त्यामुळे लोकांची मते काय आहे हे जाणून घेऊन पुढे निर्णय घेऊ. मविआ काळात ८०० कोटींची मदत अजित पवारांनी मतदारसंघात केली. शरद पवारांबाबत नितांत आदर आहे. लोकांची मते जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं आमदार किरण लहामटे यांनी सांगितले.