माळेगाव : पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. पणदरे येथील खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीचोरीच्या घटना वाढल्या असून चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वी जलसंपदामंत्री राहिलेल्या अजित पवारांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे.यंदा दुष्काळाचे सावट असल्याने पाण्याची उपलब्धता कमी आहे. येणाऱ्या काळात शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यामुळे आपणही वेळेतच शेततळ्याची व्यवस्था करावी. ठिबक सिंचनावर अधिकाधिक भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका ठेवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच धान्य महागले आहे, डाळ दोनशे रुपयांवर गेली आहे, अशा परिस्थितीत आम्ही खायचे काय? असा सवालही त्यांनी सरकारला केला. दुधाला १९ रुपयांहून अधिक दर देणे अशक्यशासन दुधाला २० रुपये दर देण्यास सांगत आहे. मात्र, सगळा हिशेब केला तर १९ रुपयांपेक्षा जास्त दर देऊच शकत नाही. काही दूध संघ तोटा सहन करून दर देतात, असेही पवार कळस (ता. इंदापूर) येथील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
पीक वाचवायला पाणी चोरले तर काय बिघडले?
By admin | Published: October 24, 2015 3:25 AM