ठाणे - जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित विभाग तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे असा संतप्त सवाल विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
अजित पवार म्हणाले की, खासदार ,आमदार यांना संरक्षण दिले याबाबत दुमत नाही. मात्र १०० लोकांना संरक्षण देता, त्यांचा खर्च सरकारच्या तिजोरीवर पडतो. तो खर्च करोडो रुपयांवर जातो. हे संरक्षण कुणाकुणाला दिले आहेत तर त्यामध्ये त्यांचे व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे व्यवसाय बदलावे, रितसर व्यवसाय करा म्हणजे धोका असण्याचे कारण नाही असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
त्याचसोबत माझ्याकडे १०० लोकांची यादी आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत त्याबद्दल दुमत नाही. सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात आला तर त्यांना संरक्षण देणे हे गरजेचे आहे. त्याबद्दलही आक्षेप नाही पण त्या १०० जणांच्या यादीत निम्म्याच्यावर ज्यांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची अजिबात गरज नाही. फक्त मोठेपणा मिरवण्याकरीता जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न कशाला करत आहात असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील किती व्यक्तींना संरक्षण दिले आहे. त्यांची यादी, त्यांचा हूद्दा जाहीर करावा. संरक्षण कुणाला द्यायचे यासंदर्भात एक समिती असते. संरक्षण देणे हे चुकीचे नाही. परंतु आपण राज्यकर्ते झालो आहोत म्हणून आपल्या जवळच्या बगलबच्च्यांना सरकारी पैशाने संरक्षण देणे हे अजिबात योग्य नाही. ज्याला गरज आहे त्यालाच संरक्षण दिले पाहिजे. जर दिले असेल तर त्याची यादी जाहीर करा. यादी आम्हाला द्या आम्ही त्यावर माहिती घेऊ, जनतेला पण त्यांची माहिती होईल. जनतेचा पैसा अशा पद्धतीने खर्च करणे सरकारला शोभा देत नाही अशी टीकाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.