मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. अदानी प्रकरण, सावरकर मुद्दा यावरून तिन्ही पक्षात मतभेद दिसून आले. त्यात महाविकास आघाडीचं भवितव्य आता सांगता येणार नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
'काका मला वाचवा म्हणायला तर...'; उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीवर शिंदे गटाचा निशाणा
सुमारे सव्वा तास शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली, त्यात महाविकास आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यावर शरद पवारांनी भाष्य करत म्हटलं की, काही मुद्द्यांवर वेगवेगळी मते असली तरी महाविकास आघाडीच्या पक्षांनी एक विचाराने काम करावे यासंदर्भात आमची चर्चा झाली. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली.
मविआत मतभेदराज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी असली तरी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद समोर येत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि गौतम अदानी समुहातील २० हजार कोटी रुपयांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आक्रमक झाले असताना शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री हा काही फार मोठा विषय नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून आले होते.
पवार-ठाकरे भेटीवर शिवसेनेचा टोलाउद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी निशाणा साधला. सकाळी मातोश्रीवर स्वाभिमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्व्हर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवलं. सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा सवाल देखील शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला. त्याचसोबत मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्याचं देसाईंनी सांगितले.