पुणे – दिवाळीनिमित्त आज पवार कुटुंबाचे मनोमिलन पाहायला मिळाले. पुण्यातील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसह कुटुंबातील अनेक मंडळी जमली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब एकत्र जमले, त्यात शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही सगळ्यांसाठी भूवया उंचावणारी होती. पवार कुटुंबाच्या आजच्या भेटीत काय घडलं याचा खुलासा सुप्रिया सुळे यांनी करत राजकीय मतभेद असले तरी आमच्यात वैयक्तिक दुरावा कधीच नाही असं स्पष्ट शब्दात सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दरवर्षी दिवाळीत बारामतीला सगळं कुटुंब जमते, परंतु प्रतापराव पवार यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्याने त्यांचे कुटुंब बारामतीला येणार नाही. त्यामुळे काकीची तब्येत पाहता आम्ही विशेष सोहळा आज इथं ठेवला होता. पवार कुटुंबाच्या दिवाळीची सुरुवात आजपासून झाली आहे. अजितदादांची तब्येत अजून १०० टक्के बरी नाही. डेंग्यू झाल्यानंतर पुढची काळजी जास्त घ्यावी लागते. प्लेट्सरेट कमी होतात, अशक्तपणा असल्याने अजित पवार लोकांना भेटू शकत नाही. हा आमचा कुटुंबाचा वैयक्तिक सोहळा होता, यावेळी स्नेहभोजन करण्यात आले असं त्यांनी सांगितले.
तसेच तुम्ही विसरला असाल, परंतु एनडी पाटील हे शरद पवारांच्या सख्ख्या बहिणीचे पती होते. एनडी पाटील आणि शरद पवारांचा संघर्ष तुम्ही पाहिला असेल. कितीही टोकाचे विरोध असले तरी आमचे वैयक्तिक कुणाशीही वैर नाही. काही गोष्टी वैयक्तिक असतात, राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आमच्यावर यशवंतराव चव्हाणांनी केलेले संस्कार आहेत. प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे सगळ्यांशी आमचे संबंध आहेत. सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबासोबत आजही आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमचे वैयक्तिक कुणाशीही भांडण नाही, कालही नव्हते, आजही नाही आणि उद्याही नसणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
दरम्यान, उद्यापासून बारामतीत दिवाळीचा कार्यक्रम होईल, आम्ही पवार कुटुंब सर्वजण तिथे असू. पाडवा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज बारामतीत साजरी करू. भाऊबीज ही अजितदादांच्या घरी असते. त्यामुळे भाऊबीजही होणार आहे असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले.