75 हजार पदभरतीचे काय झाले? अजित पवारांचा विधानसभेत शिंदे सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:30 AM2023-03-01T07:30:52+5:302023-03-01T07:32:13+5:30
राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्ही त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारने सत्तेवर येताच राज्यात ७५ हजार पदांची नोकरभरती करण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा करून सहा महिने होऊन गेले, भरतीचे काय झाले? राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्ही त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.
विधानसभेत मांडलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारने नोकर भरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांची निवड केली; पण आपण लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही, असे या कंपन्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने ज्या कंपन्यांची क्षमता आहे, अशा कंपन्यांची निवड करून भरतीबाबत ठोस कार्यक्रम तयार करावा.
सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्त्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरू आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले...
nअरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली, पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झाले. मात्र, या स्मारकाचे पुढे काहीही झाले नाही, त्याचा साधा उल्लेखसुद्धा अभिभाषणात नाही.
nइंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख भाषणात नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा विसर पडला आहे.
nडावोस येथील अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्याच्या तिजोरीतून ४० कोटीची उधळपट्टी करण्यात आली.