नाशिक - गेल्या महिन्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडले. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. त्याचे पडसाद आता विविध आस्थापनांमध्ये दिसून येणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आलेल्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. ते स्वीकारण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पद सोडले होते. त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवं सरकार सत्तेवर आलं तरी हे पद सोडण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्यातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून महिलांना न्याय देण्याचं काम महिला आयोगाकडून केलं जाईल, असेही रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
२०१९ मध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर सुमारे दोन वर्षे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे रिक्त होतं. अखेरीस या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. मात्र गेल्या महिन्यात राजकीय उलथापालथ होऊन महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार व्हावे लागल्याने आता रूपाली चाकणकर ह्या पदावर राहणार की राजीनामा देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.