पंढरपूर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या काही दिवसांपासून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी जसं हे मंदिर पाहिलं होतं तसेच ते पुन्हा समोर आणण्याचं काम जोमात सुरू होतं. त्यातच गुरुवारी मध्यरात्री मंदिरात तळघर सापडलं आहे. हे तळघर जवळपास ७-८ फूटांचे असल्याचं दिसून आले.
यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तळघरातून अनेक पुरातन वस्तू, प्राचीन मुर्त्या, जुनी नाणी आणि काही बांगड्याचे अवशेष काढण्यात आले आहेत. आतापर्यंत या तळघरातून ३ दगडांच्या मूर्त्या बाहेर काढल्यात. मध्यरात्री मंदिरात काम करताना खोलीसदृश्य वास्तू आढळून आलं. त्यानंतर आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा आतमध्ये ६ बाय ६ फूटाचे चेंबर आहे. त्याखालीही आणखी चेंबर आहे. खूप मोठ्या प्रमाण माती साचली आहे असं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत तळघरात काय सापडलं?
मंदिरात सापडलेल्या या तळघरातून ३ मोठ्या दगडी मूर्त्या, २ छोट्या मूर्त्या आणि १ पादुका असे अवशेष सापडले आहेत. त्यासोबत मातीत काचेच्या बांगड्या त्याचे तुकडे आढळले आहेत. काही जुनी नाणी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. हे बांधकाम चुन्याचे प्लास्टर आहे. आणखीही काही दगडी मुर्त्या तळघरात असल्याचं दिसून येते. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. दरम्यान, सापडलेल्या मुर्त्या या १२-१३ व्या शतकातील असण्याची शक्यता आहे. यात व्यंकटेशाची मूर्ती आहे. काही मुर्त्या छोट्या आकाराच्या आहेत. एक मूर्ती ३ ते साडे तीन फुटाची आहे.
गेल्या २ महिन्यापासून मंदिर बंद
विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप व इतर ठिकाणी काम सुरू आहे. १५ मार्चपासून गाभार्यात जतन व संवर्धन करण्याच्या कामामुळे भाविकांना विठुरायाचे चरणस्पर्श करता येत नव्हते. हे काम अंतिम टप्प्यात आलं असून २ जून पासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तत्पूर्वी मंदिरात हे तळघर सापडलं आहे. त्यामुळे आणखी काही तळघरे मंदिरात आहेत का याचाही शोध पुरातत्व विभागाकडून घेतला जाणार आहे.