गांधीबागेत फटाका दुकानांकडून निकषाचे पालन नाही : मोठ्या धोक्याची शक्यतानागपूर : दिवाळीच्या पर्वावर शहरात फटाक्यांच्या दुकानांना ज्या निकषावर परवाने मिळालेले असतात त्या निकषाचे पालन अनेक दुकानदारांकडून होत नसल्याने वर्दळीच्या मार्गावरील दुकाने स्फोटकांचे अड्डे बनले आहेत. विशेषत: अग्रसेन चौक ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर पन्नासवर फटाक्यांच्या दुकानांची स्थिती पाहता मोठा धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळी म्हटले की फटाके आलेच. दिवाळीच्या या दहा दिवसात शहरात २०० कोटीच्यावर फटाक्यांचा व्यवसाय होतो. मागील वर्षी किरकोळ फटाका विक्रेत्यांची सुमारे पाचशेच्यावर दुकाने लागली होती. या वर्षी खुल्या मैदानातील व पक्के बांधकामातील फटाक्यांच्या दुकानांची संख्या याच्या दुप्पट गेली आहे. तात्पुरत्या फटाक्याचे दुकान लावण्यासाठी दुकानदाराला पोलीस प्रशासनाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागते. यात दुकानात पुरेशा प्रमाणात दोन बादल्या रेती, पाण्याचा ड्रम व आगीपासून सुरक्षेच्या उपकरणाची व्यवस्था करण्यात येईल, दुकानाच्या आजूबाजूस ज्वालाग्रही, ज्वलनशील पदार्थ किंवा पेट्रोल, रॉकेल व इतर पदार्थ बाळगणार नाही व कोणालाही बाळगू देणार नाही, फटाका दुकानापर्यंत अग्निशमन दलाची गाडी येण्याकरिता मोकळा मार्ग राहील, आदी लिहून द्यावे लागते. परंतु मैदानातील फटाक्यांच्या दुकाने सोडल्यास, वर्दळीच्या मार्गावरील किंवा वसाहतीत असलेल्या दुकानांकडे पाहिल्यास हे सर्व नियम कागदोपत्री असल्याचेच दिसून येते. विशेषत गांधीबाग परिसरातील अनेक दुकानदारांनी तर आपले फटाके ठेवण्यासाठी सर्रास फुटपाथचा वापर केला आहे. सूत्रानुसार याच परिसरात काही मोठ्या दुकानदारांनी गांधीबाग परिसरात रिकाम्या खोल्या भाड्याने घेऊन त्याचा वापर फटाक्यांच्या गोडावूनसाठी केला आहे. काही फटाक्यांची दुकाने तर पानठेले, चहाटपऱ्या आणि मंदिराच्या बाजूला आहेत. त्यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता आहे. अनेक दुकानांमध्ये दर्शनी भागात ठेवण्यात आलेले अग्निशमन यंत्र निकामी असल्याचे तर अनेकांकडे आग विझविण्यासाठी पाणी किंवा रेतीही नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
तर स्फोट झाल्यास काय ?
By admin | Published: October 23, 2014 12:29 AM