लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपबरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही. माझ्यासमोर या चर्चा झाल्या. मी कधी नाही म्हणत नाही. राजकीय पक्षात हा संवाद राहिला पाहिजे. तो संवाद म्हणजे निर्णय नव्हे. सर्व चर्चा झाल्यानंतर सगळे मिळून अंतिम निर्णय घेतात; पण तसा निर्णय झाला नाही, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत केला.
तुमचे सोडून गेलेले सहकारी वारंवार सांगतात २०१४ पासून आम्ही भाजपसोबत होतो. पवारांनी अनेकदा भाजपबरोबर जाण्याबाबत चर्चा केली आणि आता म्हणतात आम्ही गद्दारी केली, याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, कुठल्याही राजकीय संघटनेत जी स्थिती असते त्यासंदर्भात सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद असला पाहिजे. मते वेगवेगळी असू शकतात. कोण म्हणू शकते एकत्र यायला हवे, कोण म्हणू शकते या विचारधारेबरोबर जायला नको. भाजप हा एक पर्याय आहे, दुसरे कुठले पर्याय आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असे, त्यात मी नकार देत नाही.
अजित पवारांनी बंड करून त्यांचे राजकारण मर्यादित करून घेतले किंवा परावलंबी करून घेतले का, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, मला त्यावर भाष्यच करायचे नाही. कारण जे आमचे सहकारी वेगळी भूमिका घेत आहेत, त्या सगळ्यांचे लक्ष अमित शाह यांच्याकडे आहे. अमित शाह यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राजकारण तुम्ही करत असाल तर राज्यातील जनता हे स्वीकारणार नाही असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही ज्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला तिथे काय होईल ते त्यांचे त्यांनी बघावे. हा निर्णय त्यांचा आहे.
तुमचा पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात बिलकूल साम्य नाही?शरद पवार : बिलकूल नाही. कारण त्यावेळी भाजप हा पक्षच नव्हता. त्यावेळी जनसंघ नावाच पक्ष होता, पण जेव्हा जनता पक्षाची उभारणी करण्याचा विचार झाला त्यावेळी जयप्रकाश नारायण या सगळ्यांनी जनसंघ हा पक्ष आम्ही मान्य करणार नाही, पक्षाचे सगळे झेंडे गुंडाळून ठेवा, जनता पक्ष म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन हा संघर्ष करा, म्हणून त्यावेळी जनसंघ नव्हता, भाजप नव्हता. होता तो जनता पक्ष होता. जनता पक्ष हा पुलोदमध्ये होता. त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती यात जमीन- अस्मानचा फरक आहे.
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? तिने तिची भूमिका ठरवली. लग्न झाल्यानंतर पवारची सुळे झाली. पवार आडनाव लावून आपली आयडेंटिटी असावी असा विचार तिच्या मनात कधी आला नाही. घरचे आणि बाहेरचे असे झाले. सुप्रिया बाहेरची नाही. तिचे गाव, तिचे घर, तिची शेती सगळे बारामतीला आहे. मी बारामतीला ज्या घरात राहतो ते घर तिचेच आहे. तिथली शेती तिच्याच नावावर आहे.फक्त एक आहे, तिने निर्णय घेतला की स्थानिक राजकारणात अजित पवार लक्ष घालताहेत त्यात आपण पडायचे नाही. संसदेत ती शंभर टक्के काम करते; पण इथे तिने हा दृष्टिकोन कायम ठेवला. त्यामुळे सुप्रिया पवार काय सुप्रिया सुळे काय या सगळ्या गोष्टी माझ्या मते तितक्या महत्त्वाच्या नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाल्यापासून आजपर्यंत पवार विरुद्ध पवार असा शाब्दिक सामना पाहायला मिळतो आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या निमित्ताने पुन्हा हा सामना पाहायला मिळाला. कुटुंबातील लढाई, वर्चस्वाची लढाई, पक्षांतर्गत निर्णय प्रक्रिया आणि राजकीय विचारणी याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत काय? ‘लोकमत’ डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची वेगवेगळी मुलाखत घेतली. त्यातील हा संपादित अंश.