सावंतवाडी, दि. 23 - नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली. त्यात त्यांना अनेक पदे दिली. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडताना आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मग या बारा वर्षांच्या काळात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंतांवर किती वेळा अन्याय केला? त्याला काय म्हणायचे? याची तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला. जर तुम्ही चांगले काम केले असे म्हणता, तर काँग्रेसमध्ये राहणा-यांना धमकावता कशाला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गुरुवारी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी शुक्रवारी येथील आरपीडी कॉलेजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर आदी उपस्थित होते.यावेळी विकास सावंत म्हणाले, माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली जाते. ही टीका करीत असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही विचार केला पाहिजे होता. भाईसाहेब सावंत पतपेढीबाबत चुकीची भूमिका जनतेसमोर मांडत आहेत. हा विषय सहकार न्यायालयात आहे आणि ते अठरा कोटी म्हणतात तसे काही नाही. दोन अंकी संख्या या कर्जाची नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नारायण राणे यांनी जर जिल्ह्यात चांगले काम केले आहे, तर आमच्यासोबत येणा-यांना त्यांचे कार्यकर्ते का धमकावतात, असा सवाल करीत जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत, त्यांनी राणेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा व पहिला राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आव्हानही त्यांनी केले. माझ्यावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा दूत असल्याचे आरोप करतात. पण मी प्रदेशाचा सदस्य असल्याने माझे ते नेते होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे व्हायचे; पण कधीही राणे हा आमचा विषय नव्हता, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली आहेत. त्यात त्यांना महसूल, उद्योग अशी चांगली खाती दिली. तसेच एका मुलाला खासदार, दुस-याला आमदार केले. मग अन्याय कसा म्हणता, असा सवाल करीत आम्हाला गेल्या अनेक वर्षांत आपण कोणतीही पदे दिली नाहीत. तरीही आम्ही काँग्रेसमध्ये असल्याचेही विकास सावंत यांनी सांगितले. आमच्यासाठी पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. काँग्रेसवर राज्यात व जिल्ह्यात अनेक स्थित्यंतरे आली. तरी आम्ही कधीही डगमगलो नाही आणि डगमगणार नसल्याचे यावेळी सावंत यांनी जाहीर केले.