२०२४ काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची तयारी...; अजित पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 08:10 PM2023-04-21T20:10:27+5:302023-04-21T20:11:36+5:30
तीन राजकीय पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी येईल असं कुणालाही वाटले नव्हते. पण ते झाले असं अजित पवार यांनी सांगितले.
पुणे - राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर आर. आर पाटील मुख्यमंत्री झाले असते. परंतु ती संधी मिळाली नाही. आता २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपद करण्याची तयारी असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केले आहे.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसची लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्हाला संधी मिळाली नाही, प्रयत्न करणे काम असते. मतदारांचा कौल मिळणे हे जनतेचे काम असते. त्यानंतर काळात नेहमीच आम्ही दोन नंबरला राहिला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्याकडे आले. २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीची मुख्यमंत्रिपद मिळवण्याची तयारी आहे असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितले.
तो मान छगन भुजबळांचा होता
१९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा बहुसंख्य आमदारांचा कौल, चाचपणी केली जाते. अनेक दिग्गज उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांची नेता म्हणून निवड केली होती. कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात शरद पवारानंतर राष्ट्रवादी जिल्ह्याजिल्ह्यात ढवळून काढण्याचं काम छगन भुजबळ यांनी केले होते. साहजिकच त्यांचा तिथे मान होता असं अजित पवारांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण अन् उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता
पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना काय फरक जाणवला. त्यावर दोघांनाही आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता. पृथ्वीराज चव्हाण आणि मी १९९१ साली खासदार म्हणून दिल्लीत निवडून गेलो होतो. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सातत्याने दिल्लीच्या वर्तुळात राहिले. केंद्र सरकारमध्ये पीएमओ कार्यकाळाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. २०१० ला ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. उद्धव ठाकरे यांनीही आमदार म्हणून काम केले नव्हते. तीन राजकीय पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी येईल असं कुणालाही वाटले नव्हते. पण ते झाले असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आम्ही सगळ्यांनी आपलेपणाने काम केले. पृथ्वीराज चव्हाणांसोबत आम्ही ४ वर्ष काम केले. कधी कधी नाईलाजाने काम करावे लागते. कधी आनंदाने काम करावे लागते. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाईलाजाने काम केले असं स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले.
चुकतो तिथे मी वार करतो
देवेंद्र फडणवीसांबाबत मी मवाळ नाही. विधानसभेत जो चुकतो त्याच्यावर आम्ही वार करतो. आता शरद पवार आणि बाळासाहेब एकमेकांच्या घरी जेवायला जायचे. आम्ही पाहिलेय. परंतु जेव्हा सभा असायच्या तेव्हा एकमेकांवर कठोर टीका करायचे. कोणी कोणाची तुलना करू नये, यशवंतराव चव्हाण हे यशवंतराव चव्हाणच होते. ते पुन्हा होणार नाहीत. यामुळे शरद पवार आणि माझी तुलना होऊ शकत नाही असं अजित पवारांनी सांगितले.
अजित पवारांनी शेवटचा सिनेमा कोणता पाहिला?
मला पुण्यावरून ३ तास मुंबईला यायला वेळ होता. तेव्हा एकाने लॅपटॉपवर शाहरुख खान आणि दिपीका पादुकोणचा पठाण सिनेमा बघायला सांगितला. हा पूर्ण सिनेमा मी पाहिला आहे.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल?
१०० टक्के आवडेल
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?
उद्धव ठाकरे