राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:40 AM2024-09-23T09:40:17+5:302024-09-23T10:30:02+5:30

अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे.

What is cooking in state politics There is a possibility of a major earthquake in the grand alliance before the assembly election | राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

Vidhan Sabha Election ( Marathi News ) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागलं असून सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत संघर्ष रंगला आहे. मात्र निवडणुकीपूर्वी महायुतीचं स्वरुप बदलण्याच्या चर्चेला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीपासून वेगळी होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडल्यास आपल्या वाट्याला अधिकाधिक जागा येतील आणि त्याचा निवडणुकीत फायदा होईल, असा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा कयास आहे. त्यामुळे शक्य तिथे अजित पवारांच्या पक्षाची कोंडी करण्याचं चक्रव्यूह भाजप आणि शिवसेनेकडून आखण्यात आले आहे. याबाबतचं वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिलं आहे. 

राज्यातील प्रमुख पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नव्या समीकरणासह मैदानात उतरले होते. सदर निवडणुकीत महाविकास आघाडीला दमदार यश मिळालं, तर महायुतीच्या पदरी मोठी निराशा पडली. परिणामी या तीन पक्षांची महायुती जनतेच्या मनात जागा मिळवण्यात अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या निकालाची पुनरावृत्ती आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होऊ द्यायची नसेल तर काहीतरी पावलं उचलायला हवीत, अशी भावना महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांची झाली आहे. त्यामुळेच हिंदुत्वासह विविध मुद्द्यांवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केली जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, अजित पवारांनीही भाजप नेत्यांच्या आक्रमक हिंदुत्वाला जाहीर विरोध दर्शवत थेट दिल्लीतील नेतृत्वाकडे तक्रार करण्याची मानसिकता बनवली आहे. असं असलं तरी आम्ही आमच्या अजेंड्यावर ठाम राहणार असल्याचं भाजप आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे असे अडचणीचे मुद्दे समोर करून अजित पवार हे जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधीच स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा करू शकतात.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

महायुतीतील एक्झिटबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. "आमच्यात आणि महायुतीतील इतर पक्षांमध्ये काही मतभेद जरूर आहेत. मात्र त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार, यामध्ये कसलंही तथ्य नाही. भाजप आणि शिवसेनेतील ज्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत, ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं त्या पक्षांच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रश्नच नाही," असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

भाजप १६० जागा लढण्यासाठी आग्रही?

महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असून भाजपला २८८ पैकी १६० जागा लढवायच्या आहेत. भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची आज आणि उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अन्य नेते उपस्थित असतील. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे.
 

Web Title: What is cooking in state politics There is a possibility of a major earthquake in the grand alliance before the assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.