NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आपल्या विविध वक्तव्यांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर भुजबळांचा सूर बदलला असून आधी उमेदवारीबद्दलची नाराजी, नंतर भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्यामुळे दलित समाज अस्वस्थ झाल्याचं केलेलं वक्तव्य आणि आता मनुस्मृतीतील श्लोकांच्या अभ्यासक्रमातील समावेशानंतर छगन भुजबळ हे आपल्याच सरकारविरोधातच दंड थोपटत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, या चर्चेनं राजकीय वर्तुळात जोर पकडला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर त्यांना साथ देणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश होता. अजित पवार यांनी भाजप-शिवसेना या युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर ८ सहकाऱ्यांसह भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बराच काळ ते अजित पवार यांच्या बंडाचं समर्थन करत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या निमित्ताने भुजबळ दुखावले गेले आणि नंतर त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारलाच घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं.
भुजबळांची नाराजी दाखवणारी ती ४ वक्तव्यं कोणती?
१. लोकसभा उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नाशिकमधून भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. भाजप हायकमांडकडूनच सुरुवातीला त्यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. मात्र नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं नाशिकची जागा सोडण्यास नकार दिला आणि छगन भुजबळ उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडले. त्यानंतर भुजबळ यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मला उमेदवारी नाकारल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाल्याचंही भुजबळ म्हणाले होते. तसंच आधी विदर्भात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणाऱ्या भुजबळांनी नंतरच्या टप्प्यात मात्र नाशिक वगळता इतर कुठेही प्रचारासाठी जाणं टाळलं. अगदी नाशिकमध्येही भुजबळांनी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी कितपत मदत केली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
२. अब की बार, ४०० पार घोषणेचा फटका बसल्याची कबुली
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "मला आपल्याला सांगायचंय की, आधीच चारशे पार...चारशे पार ही घोषणा देण्यात आली आणि संविधान बदलणार हे दलित समाजाच्या मनावर इतके बिंबले की ते काढता काढता नाकी नऊ आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका टीव्ही मुलाखतीत १५ ते २० मिनिटं हेच सांगत होते की आम्ही संविधान बदलणार नाही, उलट संविधान दिन साजरा करणार आहोत. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्याला आताच्या निवडणुकीत जाणवला," अशा शब्दांत भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
३. मनुस्मृतीवरून आक्रमक भूमिका
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश केला जाणार आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच छगन भुजबळ यांनीही आक्रमक भूमिका घेत ही कृती मान्य नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. "आता मनुस्मृतीचा विषय समोर आला आहे. शाळांमध्ये मनुस्मृतीतील काही गोष्टी अभ्यासक्रमात येणार, अशी चर्चा सुरू आहे. मनुस्मृती म्हटलं की झालं मग कल्याण! वर्णव्यवस्था मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळली आहे. असं असताना आता पुन्हा कोणीतरी हे विषय वर काढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही आगामी काळात याबाबत आक्रमक भूमिका घेऊ," अशी घोषणाच छगन भुजबळ यांनी केली आहे.
४. विधानसभा जागांची आग्रही मागणी
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. अजित पवार गटाला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, असं विधान पक्षाच्या बैठकीत केलं होतं. त्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून आपली नाराजी जाहीर व्यासपीठांवरून मांडू लागले आहेत. पक्षाच्या अध्यक्षांना भेटून ज्या मुद्द्यांबाबत आक्षेप आहेत, ते नोंदवणं शक्य असतानाही भुजबळांकडून जाहीरपणे फटकेबाजी केली जात असल्याने त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, विधानसभा निवडणुकीपूर्वी ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय, याबाबतही आता तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ हे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.