लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री शिवसेनेचे दादा भुसे आणि याच पक्षाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात शुक्रवारी विधानभवनच्या लॉबीमध्ये जोरदार खडाजंगी अन् धक्काबुक्की झाली. दोघेही एकेरीवर आले. मंत्री भुसे यांनी असे काही घडल्याचा इन्कार केला पण भुसे एकदम ‘ॲरोगंट’ मंत्री आहेत, असे थोरवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. विधिमंडळाच्या लॉबीमधून मंत्री दादा भुसे जात असताना आ. थोरवे हे त्यांच्याशी विकासकामावरून चर्चा करताना मोठ्या आवाजात बोलले. दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून धक्काबुक्की झाली. लॉबीमध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली. यामुळे सत्ताधारी शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसून अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.
विरोधकांचा निशाणाराष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी संबंधित घटनेची माहिती घेऊन सभागृहात द्यावी, अशी मागणी केली. गँगवॉर सभागृहापर्यंत आले असेल तर चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
सभागृहाचे कामकाज थोड्या वेळासाठी बंद करून नंतर सभागृहाला माहिती द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला.
प्रकरण नेमके काय? nकर्जत मतदारसंघातील एक सरकारी जागा कामांसाठी द्यायची होती.nत्यासाठी एमएसआरडीसीचा ठराव होणे आवश्यक होते.nतसा ठराव करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊनही मंत्री भुसे तो करत नसल्याने थोरवे कमालीचे नाराज होते. यातूनच झटापट झाली.
कामकाज तहकूबnवादाचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले. मंत्री व आमदार भांडत असतील तर त्याचा खुलासा सरकारने केला पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी सदस्यांनी केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, याची नोंद घेतली आहे. ही बाब तपासून घेतली जाईल. तरीही विरोधक मागणीवर ठाम होते. गोंधळ सुरूच राहिल्याने उपसभापतींनी एक तासासाठी कामकाज तहकूब केले.
आमच्या दोघांमध्ये असे काहीच घडलेले नाही. तसेच सीसीटीव्हीचे फुटेजही पाहायला काहीच हरकत नाही. अध्यक्ष ते दाखवू शकतात.- दादा भुसे, सार्वजनिक उपक्रम मंत्री
दादा भुसे मला बोलले म्हणून मी त्यांना बोललो. आमच्याशी अशा भाषेत बोलू नका, असे मी त्यांना सांगितले. दादा भुसे एक ॲरोगंट मंत्री आहेत.- महेंद्र थोरवे, आमदार
काय पुरावा?भुसे व थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा काय पुरावा आहे, जे घडलेच नाही ते तुम्ही कसे दाखवता, असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना थोडा आवाज वाढला, असे ते म्हणाले.