"देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले", रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 05:43 PM2024-08-11T17:43:48+5:302024-08-11T17:46:20+5:30
Rohit Pawar : लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बार्शीमध्ये शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन राज्य सरकारला घेरले. तसेच, महायुतीवर निशाणा साधला. या शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते, पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे. त्यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडलं, पक्ष फोडले, तुकाराम महाराजांच्याबद्दल बोललं गेलं, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचं राज्य सुरु आहे, अशा स्थितीत तुम्ही शांत बसता. मग तुमचं हेच कर्तृत्व का? असा सवाल करत लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
याचबरोबर, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं पाच हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. मात्र, त्यावर राज्यातले नेते काहीही बोलत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले की केंद्र सरकारनं कांद्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता, पण खरं तर अजित पवार हे सत्तेत आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते, अशी टीका रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली.
"लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत"
लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीचे बादशाह आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचे आहे की, शरद पवार हे भटकती आत्मा नाहीत, तर इथं असलेल्या सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची, स्वाभिमानी लोकांची पवारसाहेब आत्मा आहेत, असं रोहित पवार म्हणाले. तसंच, आमचा महाराष्ट्र आमचा स्वाभिमानी आहे. त्यामुळं तुम्ही कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.