शरद पवारांची निवृत्ती घोषणा, काँग्रेसला वाटते वेगळीच शंका, मविआवर काय परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:54 AM2023-05-03T09:54:24+5:302023-05-03T09:57:52+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त ऐक्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर नागपूर आणि सोमवारी मुंबईत झालेल्या सभेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला होता

What is the effect of Sharad Pawar's retirement announcement? Amid Congress doubt, BJP's 'wait and watch' | शरद पवारांची निवृत्ती घोषणा, काँग्रेसला वाटते वेगळीच शंका, मविआवर काय परिणाम?

शरद पवारांची निवृत्ती घोषणा, काँग्रेसला वाटते वेगळीच शंका, मविआवर काय परिणाम?

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस असलेली अस्वस्थता आणि शरद पवार यांनी पद सोडण्याची केलेली घोषणा व त्यानंतरचा घटनाक्रम या सगळ्यांचा परिणाम महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर होण्याची शक्यता आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त ऐक्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर नागपूर आणि सोमवारी मुंबईत झालेल्या सभेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे अधिक सख्य असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच आहे. 

शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष अधिक सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये ज्या जोरदार हालचाली सुरू आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वासाठी आहेत की भविष्यात भाजपसोबत जाण्यासंदर्भात आहेत, याबाबत चित्र स्पष्ट नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधाची धार अधिक तीव्र केली  असली तरी  आपल्या लढ्यात राष्ट्रवादी नेहमीसाठी सोबत राहील का, याबाबत आता ठाकरे गटात शंकेचे वातावरण आहे.

काँग्रेस शंकेच्या वावटळीत, भाजपचे ‘वेट अँड वॉच’

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले, की राष्ट्रवादीबाबत शंकेचे वातावरण आहे. उद्या जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर आम्हाला नव्याने मोट बांधावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आज महाविकास आघाडीसोबतच आहे; परंतु शरद पवार हे पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर कायम राहिले तर नवीन अध्यक्ष येतील ते भाजपसंदर्भात कोणती भूमिका घेतात हे अत्यंत महत्त्वाचे असेल आणि त्यावरच महाविकास आघाडीचे ऐक्य अवलंबून असेल. 

राष्ट्रवादीतील घडामोडीवर भाजपकडून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे. केवळ निवडक नेत्यांनीच याबाबत भाष्य करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या निर्णयावर इतर पक्षाचे नेते काय म्हणतात?

आघाडीवर परिणाम होणार नाही - राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण स्वतः शरद पवारच करू शकतात. हा निर्णय धक्कादायक वाटत असला तरी त्यात अनपेक्षित असे काही नाही, असे अलीकडच्या काही घटनांवरून वाटते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

आता बोलणे योग्य नाही - फडणवीस
शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यांना भेटून जाणून घेऊ -पटोले
नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे. त्यांना भेटू, सर्वकाही जाणून घेऊ मग यावर बोलणे योग्य ठरेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Web Title: What is the effect of Sharad Pawar's retirement announcement? Amid Congress doubt, BJP's 'wait and watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.