राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे.
मनोज जरांगे पाटील सगेसोयरे शब्दावर ठाम होते. अध्यादेशमध्ये सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख असावा, अशी मनोज जरांगे पाटील वारंवार मागणी करत होते. अखेर सरकारने सगेसोयरेचा समावेश अध्यादेशमध्ये केला. राज्य सरकारने नवीन जो अध्यादेश काढला, त्यामध्ये सगेसोयरेचा नेमका अर्थ काय, हे स्पष्ट केले आहे.
सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असं राज्य सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशात म्हटलं आहे.
दरम्यान, मध्यरात्री सरकारचं शिष्टमंडळाने नवीन अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितले. यानंतर मनोज जरांगेंनी सरकारच्या या निर्णयाबाबत मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर आपण आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. समाजाला विचारून मी हा निर्णय घेतला आहे. मी मराठा समाजाला मायबाप मानलं आहे, मी मुलगा म्हणून काम करतो, असं मनोज जरांगे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.