उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला.
राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं, अशी सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. आज दुपारी ४ पर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल, असंही निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून नाव आणि चिन्ह कोणते दिले जाणार याबाबत देखील चर्चा रंगू लागली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निकालावरुन शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाची पुढे भूमिका काय असणार?, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार की नाही?, याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे. याचदरम्यान सुप्रिया सुळेंनी महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही आज दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर देऊ आणि निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. तसेच चिन्हाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहितीही सुप्रिया सुळेंनी दिली. सुप्रिया सुळे सध्या दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
निर्णय देताना निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं?
- अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवारांना परवानगी
- शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता
- महाराष्ट्रातले ४१ आणि नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
- महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
- राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हा आणि पक्षाचं नाव सुचवावं.
- ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
- राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत.
निकाल नम्रपणे स्वीकारतो-
कोणत्याही पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची पद्धत आहे. यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. आमचे म्हणणे मांडले, इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले. लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह घडाळ आणि झेंडा आम्हाला मिळाल्या. आमच्या सोबतच्या ५० आमदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. विधासभेत अध्यक्षांसमोरही सुनावणी झाली आहे. ते कधी निकाल देतील ते माहिती नाही. ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.