महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजुने आहेत. असे असले तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत कोणालाच बहुमत मिळाले नाही तर सरकार स्थापन होणे अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
२३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, तर २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ ४८ तास हातात आहेत. महायुती आणि मविआने अपक्ष, छोट पक्ष आणि महाशक्तीच्या नेत्यांना फोनाफोनी सुरु केली असून बहुतासाठी गरज लागलीच तर मदत कोण करू शकेल याची चाचपणी सुरु केली आहे.
महत्वाचे म्हणजे सत्ता स्थापन करण्यापेक्षा मुख्यमंत्री कोण असेल यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता आहे. यानंतर मंत्रिपदे, यात काही फिस्कटले तर या बाजुचे त्या बाजुला आणि त्या बाजुचे या बाजुला होण्याचीही दाट शक्यता आहे.
सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होण्याचीही शक्यता आहे. राजकारणात काहीही होऊ शकते असे संकेत अजित पवारांनी निवडणूक काळातही दिले आहेत. यामुळे सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्रही येऊ शकतात. भाजपच्या जागा कमी आल्या तर पुन्हा एकनाथ शिंदे तोडपाणी करत मुख्यमंत्री पद घेऊ शकतात. या सर्व गोष्टींना ४८ तासांत करणे जवळपास अशक्य आहे. यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची शक्यता अधिक आहे.
निवडणुकीची अशी काठावर तारखा असताना घोषणा करण्यात आली तेव्हाच संजय राऊतांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. राऊतांच्या आरोप खरा-खोटा ठरविण्यापेक्षा सध्याची परिस्थिती तिकडेच बोट दाखवत आहे. आमदारांना राज्यभरातून मुंबईत यासाठी यावे लागणार आहे. २३ तारखेला अनेकांना रात्री उशीरा निवडणूक आयोग प्रमाणपत्र देतो. यानंतर त्यांना मुंबईत येण्यासाठी मिळेल तो मार्ग पकडून यावे लागते.
अशातच जर बहुमताचा आकडा कोणालाच पार करता आला नाही तर या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरु होतात. यामुळे या आमदारांना कुठेतरी दूर हॉटेलमध्ये नेऊन एकत्र ठेवावे लागते. यात आमदारांचा घोडेबाजारालाही उत येतो. अनेक आमदार फोन बंद करून बसतात, यामुळे तो पक्षही या काळात गॅसवरच राहतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बनेल असे संकेत मिळत असले तरी बऱ्याचशा गोष्टी या उद्या, २३ तारखेला ठरणार आहेत.